तब्बल २७ वर्षांनंतर यंदा ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद भारताकडे
नवी दिल्ली : स्त्रियांमधील सौंदर्य व बुद्धीचा गौरव करण्यासाठी जागतिक स्थरावर मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा भरवली जाते. यंदा बहुप्रतिक्षित ७१व्या मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी भारताची निवड झाली आहे. तब्बल २७ वर्षांनंतर भारताला हा बहुमान मिळाला आहे. भारताला असलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्याला उत्तेजन देण्याप्रती देशाची बांधिलकी तसेच महिलांच्या सक्षमीकरणाप्रती वाटणारी कळकळ यांमुळे हा प्रतिष्ठेचा सन्मान भारताला मिळाला आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी आदी बॉलिवूड अभिनेत्रींसह अनेक भारतीय स्त्रियांनी हा मिस वर्ल्डचा किताब मिळवला आहे.
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जुलिया मोर्ली यावेळी म्हणाल्या, ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी भारतात होणार आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. एका असामान्य मिस वर्ल्ड फेस्टिवलची निर्मिती करण्यासाठी मिस वर्ल्ड लिमिटेड व पीएमई एण्टरटेन्मेंट एकत्र येत आहेत. ७१व्या मिस वर्ल्ड २०२३ मध्ये, १३० राष्ट्रीय विजेत्यांचा एक महिन्यांचा भारत सफर घडवली जाणार आहे. यासाठी डॉ. सयद झफर इस्लाम यांचे सहकार्य लाभले आहे. या ७१वी मिस वर्ल्ड २०२३ या सौंदर्य स्पर्धेत १३०हून अधिक देशांतील स्पर्धक भारतात एकत्र येणार आहेत. स्पर्धकांच्या निवडीसाठी अनेक फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२३ मध्ये नियोजित महाअंतिम फेरीपूर्वी एक महिना या फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.
“७१व्या मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगाचे हार्दिक स्वागत करण्यासाठी तसेच देशाची शान, सौंदर्य व प्रगतीशील चैतन्य सर्वांपुढे आणण्यासाठी, भारत सज्ज आहे. या असामान्य प्रवासाला सर्व मिळून सुरुवात करू स्त्रियांमधील बदल घडवून आणण्याच्या शक्तीचा गौरव करण्यासाठी आमच्या सोबत सामील व्हा,” असे २०२२ सालची मिस वर्ल्ड कॅरोलिना बीलावस्का म्हणाली.
स्त्रियांमधील सौंदर्य व बुद्धीचा गौरव करणे हा मिस वर्ल्ड किताबाचा दीर्घकाळापासून लौकिक आहे. स्त्रीच्या शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न ही स्पर्धा करते. हे एक व्यासपीठ असून, स्वत:चे म्हणणे मांडण्याची, स्वत:ला महत्त्वाच्या वाटणाऱ्या बाबींचे समर्थन करण्याची आणि जागतिक स्तरावर सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्याची क्षमता ते देते. ७१व्या मिस वर्ल्ड २०२३चे यजमानपद भूषवण्याच्या माध्यमातून, अर्थपूर्ण संभाषण व कृतींमधील एक संप्रेरक घटक म्हणून त्यांचे मूल्य वाढवण्याचे उद्दिष्ट भारतापुढे आहे.
