तरुणांना उद्यमशील बनवून २०४७ मध्ये स्वावलंबी भारत घडविणार – स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय परिषदेत संकल्प
पुणे – तरुणांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांच्यामधून उद्योजक घडविण्याचा व त्याद्वारे २०४७ मध्ये स्वावलंबी भारत निर्माण करण्याचा संकल्प स्वदेशी जागरण मंचच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत करण्यात आला, अशी माहिती मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
या दोन दिवसीय बैठकीचा समारोप रविवारी महर्षी कर्वे संस्थेच्या सभागृहात झाला. यानिमित्ताने मंचाचे अखिल भारतीय सह संयोजक डॉ. अश्वनी महाजन, पश्चिम क्षेत्र सह संयोजक प्रशांत देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक हेमंत साठे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. महाजन, म्हणाले, की देशातील तरुणांमध्ये प्रतिभा आहे. त्यांच्या या प्रतिभेला वाव देण्यासाठी जिल्हा रोजगार सृजन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. देशातील ७५६ जिल्ह्यांमध्ये अशी केंद्रे स्थापन करण्यात येणार असून त्यांपैकी ४३० केंद्रे स्थापनही झाली आहेत. त्यांना बळकट करण्यासाठी १ ते ३० जून या कालावधीत सघन संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच “माय एसबीए” डिजिटल कॅम्पेन या अभियानालाही चालना देण्यात येईल. विशेषतः महिलांमध्ये उद्यमशीलता वाढविण्यासाठी स्वावलंबी भारत अभियानांतर्गत प्रयत्न करण्यात येतील, येत्या २१ ऑगस्ट रोजी जागतिक उद्योजकता दिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सहकार्याने शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. तसेच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात देशभरात 50 हून अधिक ठिकाणी स्वदेशी स्वावलंबन मेळावे आयोजित करण्यात येतील.
या बैठकीस १६ संघटनांचे प्रतिनिधी आले असून त्यात ३८ प्रांतामधून २३० पदाधिकारी ज्यात ३८ महिलांचा समावेश होता. या बैठकीत मंचाच्या पुढील एक वर्षाच्या वाटचालीची रूपरेषा ठरविण्यात आली. स्वदेशी जागरण मंचाच्या उपक्रमांमध्ये पर्सिस्टंट टेकनॉलॉजीज, जागृती आणि सेपियो, सेवावरधीनी यांसारख्या संस्था आणि कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
या परिषदेच्या निमित्ताने स्वदेशी जागरण मंचाच्या वतीने दोन निवेदने प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या निवेदनात म्हटले आहे, की २०४७ मधील भारताने समर्थ उत्पादन व्यवस्था तयार केली पाहिजे आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण थांबवायला हवी. भारतीय चलनाला प्रोत्साहन देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वस्तू आणि सेवांची निर्यात अधिक स्पर्धात्मक बनवायला हवी. दुसऱ्या निवेदनात म्हटले आहे, की जी – 20 गटाचे अध्यक्षयद ही भारतासाठी एक सुसंधी असून त्याद्वारे जगाला आज भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधता येतील जागतिक व्यापार संघटनेत होत असलेल्या विविध मुद्यांवरील चर्चामध्ये एकमत घडवून आणण्यासाठी भारताने या व्यासपीठाचा उपयोग करावा.
विज्ञान आणि आर्थिक प्रगतीत हवा समन्वय
दोन दिवसांच्या या बैठकीत एकूण सात सत्रे झाली. यामध्ये विविध विषयांवर मंथन झाले. बैठकीत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला. या प्रस्तावात म्हटले आहे की, आपण विज्ञान आणि आर्थिक प्रगतीमध्ये सामंजस्यपूर्ण संबंध सुनिश्चित केले पाहिजेत. एकात्म मानववादाच्या तत्त्वांचे पालन करून विज्ञान वरदान ठरला हवे, ते शाप ठरू नये. वर्ष 2047 मधील भारताचे लक्ष्य एका अशा विकासाचा संकल्प आहे जो ग्रामीण रोजगार आणि पर्यावरणावर केंद्रित असेल. तसेच मूल्य, नैतिकतेचे सिद्धांत, सहकार आणि विकेंद्रीकरण यांच्यावर आधारित असेल.
