Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तुम्हाला परत आंदोलन करण्याची गरज पडणार नाही; शरद पवार यांचे परतीचे संकेत

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी आज शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी “दोन दिवसांत राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे उद्या तुम्हाला परत आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. कोणताही निर्णय घेताना तुमच्या भावनांचा विचार केला जाईल, असा शब्द शरद पवार यांनी आंदोलकांना दिला. यामुळे शरद पवार हे आपला निर्णय मागे घेण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या, शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे हे विधान परतीचे संकेत देणारे आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचे जाहीर केले अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच अस्वस्था पसरली. निवृत्ती जाहीर केल्याच्या क्षणापासून कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सभागृहा बाहेर आंदोलन करीत आहे. शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी एकच मागणी त्यांनी लावून धरली आहे. अखेर आज शरद पवार यांनी स्वतः या आंदोलक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले, तुम्हाला विश्वासात घेऊन मी हा निर्णय घेण्याची गरज होती. पण मी ते केलं नाही. मी तुम्हाला आधी याविषयी कल्पना दिली असती तर मला हा निर्णय घेता आला नसता. मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मात्र उद्या तुम्हाला येथे आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असे सूचक विधान पवार यांनी यावेळी केले. त्यामुळे पक्षातील अस्वस्थता उद्या शमेल अशी अपेक्षा आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading