Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

पस्तीस ट्रिलीयन अर्थव्यवस्थेसाठी आतापासूनच नियोजन महत्वाचे – सीए अनिकेत तलाठी

पुणे : “सनदी लेखापाल घडवणारी ‘आयसीएआय’ संस्था पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत असून, सध्या भारताची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलीयन इतकी आहे. संस्था शताब्दी महोत्सव साजरा करतेवेळी म्हणजे २०४९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ३५ ट्रिलीयनची होईल, असा अंदाज आहे. त्यावेळी गरज असलेली सीएंची संख्या, गुणवत्ता आणि दर्जा याचा अंदाज बांधून आतापासूनच नियोजन महत्वाचे असून, त्यादृष्टीने आम्ही पायाभरणी करत आहोत,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी यांनी केले.

पुणे आयसीएआयच्या वतीने आयोजित संवाद कार्यक्रमात सीए तलाठी बोलत होते. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, सचिव सीए अजिंक्य रणदिवे, खजिनदार सीए हृषीकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए काशिनाथ पठारे, सीए सचिन मिनियार, सीए प्रणव आपटे, सीए प्रितेश मुनोत आदी उपस्थित होते.

सीएच्या प्रस्तावित नव्या अभ्यासक्रमाविषयी बोलताना सीए तलाठी म्हणाले, “सीएंचा व्यवसाय केवळ अकाउंटींग आणि ऑडिटींगपुरता मर्यादित न राहता तो व्यापक बनला आहे. त्यासाठी विविध नवे कायदे, सॅप, इआरपी, एआय, ब्लॉकचेनसारखे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल करून ‘सेल्फ पेस लर्निंग मॉडेल’ तयार करण्यात येत आहे. तंत्रज्ञानामुळे सीएची परीक्षा पास झाल्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन सदस्यत्व प्राप्त करणे शक्य झाले असून इन्स्टिट्यूटच्या इतरही सुविधा तातडीने मिळवता येतात.”

“भोपाळ, औरंगाबाद, बडोदा यासारख्या शहरांतून पहिल्यांदाच केंद्रीय समितीमध्ये सदस्यांचा समावेश झाला आहे. इन्स्टिट्यूटच्या विस्ताराचे हे द्योतक आहे. या विस्तारासाठी पूरक आणि काळाची गरज असलेल्या ऑनलाईन, डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांचा अंगीकारही करण्याची गरज आहे,” असे तलाठी यांनी नमूद केले.

सीए चंद्रशेखर चितळे यांनी वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटन्ट्स झाल्यानंतर जगाचा ‘आयसीएआय’कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याचे सांगितले. सिंगापूर असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स या संस्थेने तिथे चार्टर्ड अकाउन्टन्सीची प्रॅक्टिस करण्यासाठीचे नियम एकदम शिथिल करण्याचा निर्णय सकारात्मक असल्याचे चितळे म्हणाले.

सीए राजेश अग्रवाल यांनी स्वागत मनोगत व्यक्त केले. सीए अजिंक्य रणदिवे यांनी प्रास्ताविकात पुणे शाखेने दहा हजार सदस्यांचा टप्पा गाठल्याचे सांगत इन्स्टिट्यूटची मूलभूत माहिती दिली. सीए हृषीकेश बडवे यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading