शाहिरी कला हा महाराष्ट्राचा प्राण
पुणे : शाहिरीमुळे प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहण्यासोबतच वीररसाची अनुभूती व प्रसन्नता निर्माण होते. देश पारतंत्र्यात असताना इंग्रजांविरोधात शाहिरांमार्फत मोठया प्रमाणात जागृती झाली. आपला जाज्वल्य इतिहास शाहिरीतून सांगण्यात आला. त्यामुळे शाहिरी कला हा ख-या अर्थाने महाराष्ट्राचा प्राण आहे, असे मत भारत सरकार आयसीसीआर च्या सदस्य लीना आढाव यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व्या वर्षाच्या मोफत पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे करण्यात आले आहे. वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी वाद्यपूजन करताना सोसायटीच्या शाला समितीचे अध्यक्ष अशोक पलांडे, ब्रिगेडियर (निवृत्त) प्रसाद जोशी, डॉ.सुनिल भंडगे, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगिता मावळे आदी उपस्थित होते. आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे हे सलग २६ वर्षे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत.
अशोक पलांडे म्हणाले, महाराष्ट्रातील लोककला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न शाहिरीच्या माध्यमातून होत आहे. मोफत पोवाडा वर्गासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शाहिरीचा प्रवास असाच पुढे सुरु रहायला हवा. शाहिरीच्या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढत असून ही आनंदाची बाब आहे. पोवाडा व शाहिरी कला शिकताना त्याचा सखोल अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा.संगिता मावळे म्हणाल्या, शाहिरीचा प्रचार, प्रसार हे बोधवाक्य घेऊन प्रबोधिनीचे काम सुरु आहे. गेली २६ वर्षे पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून विद्यादानाचे काम सुरु असून पोवाडा ही संघर्ष करायला शिकविणारी कला असल्याचे त्यांनी सांगितले. आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.
