केवळ दलितांचे नेते ही प्रतिमा डॉ.आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर अन्याय करणारी – प्रा. सुभाष वारे
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यात अनेक आंदोलने, अभियान राबविताना जे लिहून ठेवलेले आहे, ते आज समजून संपूर्ण अंमलात आणणे शक्य होणार नाही एवढे मोठे ते कार्य आहे. बाबासाहेब हे सोशित जमातीचे किंवा दलितांचे नेते होते, ही प्रतिमा त्याकाळी रुजविली गेली. केवळ दलितांचे नेते ही त्यांची प्रतिमा त्यांच्या कर्तृत्वावर अतिशय अन्याय करणारी आहे. बाबासाहेबांच्या कामाचा आढावा घेतला, तर ते जे काही करीत होते, ते केवळ दलितांच्या भल्याचे नव्हते, तर संपूर्ण समाजाच्या हिताचे होते, असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे तिसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. त्याचा प्रारंभ प्रा. वारे यांच्या व्याख्यानाने झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. दिनांक २३ एप्रिल पर्यंत दररोज रात्री ८ वाजता ही व्याख्यानमाला आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.
प्रा.सुभाष वारे म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणा-या समाजसुधारकांपैकी महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.आंबेडकर हे होते. आज एकीकडे अब्जाधिश वाढत आहे, तर दुसरीकडे गरीबांची संख्या वाढत आहे. कायदे धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र आहे. संविधानाच्या विरोधात अनेक धोरणे राबविली जात आहेत. त्यामुळे डॉ.बाबासाहेबांच्या विचारांवर चालत राहून आपण वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, व्याख्यानमालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील बाबासाहेब सर्वांचे, शाहिरांचे भीमराव, डॉ.आंबेडकर भारतीय संविधान व सद्यस्थिती, डॉ.आंबेडकर व शिक्षणाचे महत्व, डॉ.आंबेडकरांचे शेतीविषयक विचार, डॉ.आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीतील योगदान, जल व उर्जा याविषयातील योगदान, डॉ.आंबेडकरांचे आर्थिक विचार अशा विविध विषयांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या https://www.youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होत आहेत.
