Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल  – राज्यपाल रमेश बैस

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ७) राजभवन येथे ‘कैवल्यधाम’ योग संस्थेतर्फे ‘कार्यालयीन योग’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत राज्यपाल बोलत होते.

आरोग्य दिनानिमित्त हृदयविकाराच्या धक्क्याच्या वेळी रुग्णाला वाचविण्यासाठी वापरावयाचे इमर्जन्सी वैद्यकीय तंत्र (सीपीआर टेक्निक) या विषयावर देखील व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यालयाच्या ठिकाणी काही क्षण वेळ काढून योग करण्याची नव्याने रुजू होत असलेली संकल्पना जीवनशैली संबंधित आजारांकरिता चांगली असून योग म्हणजे केवळ शारीरिक आसने किंवा श्वसनाचे व्यायाम नसून योग ही निरामय जीवनासाठी समग्र जीवनशैली असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

हृदयविकाराचा धक्का आल्यास किंवा श्वास थांबल्यास उपस्थित लोकांनी सीपीआर तंत्राचा वापर केल्यास रुग्णाला जीवनदान देता येते. हे तंत्र सोपे आहे. त्यामुळे सर्वांनी हे तंत्र शिकून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी कैवल्यधाम संस्थेच्या वतीने योगशिक्षक रवी दीक्षित यांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग कार्यशाळा घेतली. राज्यपालांसह सर्वांनी यावेळी योग केला.

सीपीआर तंत्र शाळेत व महाविद्यालयात शिकवावे : डॉ. समीर पागड

हृदयविकाराच्या धक्क्यामुळे एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबल्यास त्याच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने व वारंवारतेने दाब दिल्यास हृदयाचे पंपिंग सुधारून रुग्णाचा जीव वाचवता येते. हे तंत्र सोपे असून ते सर्व शाळा व महाविद्यालयात आवर्जून शिकविले पाहिजे, असे प्रतिपादन बॉम्बे हॉस्पिटल येथील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. समीर पागड यांनी केले.

यावेळी कैवल्यधामचे विश्वस्त डॉ. दिनेश पंजवाणी व राजभवन येथील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading