पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; कल्याण इलेव्हन, स्पाटर्न्स क्रिकेट क्लब संघांचा सलग विजय
पुणे : जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कल्याण इलेव्हन आणि स्पाटर्न्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.
सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कृष्णा भट याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पाटर्न्स क्रिकेट क्लबने आयडीआज्-अ-सास संघाचा १३५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पाटर्न्स क्रिकेट क्लबने २०३ धावांचा डोंगर उभा केला. विवेक कुबेर याने ७० धावांची खेळी केली. प्रतिक जावेकर (२८ धावा), गौरांग गोवांडे (२७ धावा) आणि नचिकेत कुलकर्णी (२७ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आयडीआज्-अ-सास संघाचा डाव ६८ धावांवर गडगडला. कृष्णा भट याने १५ धावात ५ गडी बाद करून आयडीआज् संघाच्या डावाल खिंडार पाडले आणि सामन्यात महत्वपूर्ण कामगिरी केली.
ऋत्विक महाजन याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कल्याण इलेव्हन संघाने ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबचा ३ गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना उत्कर्ष चौधरी याच्या नाबाद ७६ धावा आणि मोहम्मद ताहीर (३० धावा) यांच्या फलंदाजीमुळे ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १५९ धावा धावफलकावर लावल्या. कल्याण इलेव्हन संघाच्या ऋत्विक महाजन याने ५८ धावांची आणि चिराग शेरकर याने ४६ धावांची खेळी केली. यामुळे संघाने हे आव्हान ३ गडी राखून पूर्ण केले.
निकालः
स्पाटर्न्स क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद २०३ धावा (विवेक कुबेर ७० (४१, ११ चौकार, २ षटकार), प्रतिक जावेकर २८, गौरांग गोवांडे २७, नचिकेत कुलकर्णी २७, नृपाल सवे २-३६) वि.वि. आयडीआज्-अ-सासः १२.४ षटकात १० गडी बाद ६८ धावा (तुशार महामुनी नाबाद १०, अवांतर धावा २०, कृष्णा भट ५-१५, रिषी २-१४); सामनावीरः कृष्णा भट;
ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी १५९ धावा (उत्कर्ष चौधरी नाबाद ७६ (५३, ६ चौकार, ३ षटकार), मोहम्मद ताहीर ३०, रोहीत ठाकूर १-१८) पराभूत वि. कल्याण इलेव्हनः १९.४ षटकात ७ गडी बाद १६१ धावा (ऋत्विक महाजन ५८ (३९, १० चौकार, १ षटकार), चिराग शेरकर ४६, मोहम्मद ताहीर २-१७); सामनावीरः ऋत्विक महाजन.
