Corona Update : गेल्या २४ तासात देशात तब्बल ४,४३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ४,४३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील १६३ दिवसांमधील ही सर्वाधिक संख्या आहे. तसेच गेल्या २४ तासांत आढळलेल्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३,०९१ वर पोहोचली आहे. ही कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक असून यामुळे भारतात पुन्हा एकदा निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एका बाजूला नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्यादेखील वाढली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनामुळे १५ रुग्णांनी जीव गमावला आहे. यापैकी महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी चार मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. तर छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५,३०,९१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
