ऊस तोडणी मशीन मालकांचे आझाद मैदानावर उद्या आंदोलन
मुंबई : ‘२०१७ पासून प्रलंबीत अनुदान मिळावे, मशीनने ऊस तोडणी दर ७०० रूपये करणे आणि ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करावा. या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे उद्या (दि. 5 एप्रिल) आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव यांनी दिली.
या संदर्भातील एक निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, सहकार आयुक्त शेखर गायकवाड, सहकार मंत्री,अतुल सावे यांना देण्यात आले आहे. या आंदोलनाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा संपूर्ण पाठिंबा आहे.
महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंखे, उपाध्यक्ष प्रभाकर भिमेकर, सचिव अमोलराजे जाधव, सुभाष सातारकर, श्रीकांत नागणे, नीलेश बगाटे, युवराज पाटील, शरद चव्हाण, सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात सदरील आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनात पुणे, लातूर, बीड, कोल्हापूर, सातारा, नांदेड, सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील 500 हुन अधिक ऊस तोडणी मशीन मालक सहभागी होणार असल्याचे अमोलराजा जाधव यांनी सांगितले.
