Wednesday, June 24, 2026
Latest NewsPUNE

सामाजिक संस्था करताहेत संस्कृती मूल्य जपण्याचे कार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी

पुणे : समाजातील अनेक संंस्था या सार्वजनिक म्हणून आहेत, मात्र त्या खाजगी स्वरुपात चालविल्या जातात. सेवा या शब्दाऐवजी या माध्यमातून मेवा मिळावा, ही आजची परिस्थिती आहे. देश-परदेशातून देणग्या गोळा करण्याचे काम काही संस्था करीत आहेत. मात्र, संस्थांकडून लोकांच्या मनात स्थान मिळणारी सेवा घडणे आवश्यक असून पुणे सार्वजनिक सभेसारख्या सामाजिक संस्था संस्कृतीमूल्य जपण्याचे कार्य करीत आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले.

पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने संस्थेच्या १५३ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून बुधवार पेठ येथील रामेश्वर मार्केट मध्ये असलेल्या संस्थेच्या सभागृहामध्ये पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विद्याधर पंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, सचिव शरद गर्भे, कोषाध्यक्ष सुरेश कालेकर, भारत साबळे, उपाध्यक्ष धनाजी चन्ने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

क्षितीज संस्थेच्या अध्यक्षा उमा माने यांना रमाबाई रानडे पुरस्कार, तर मा.स.गोळवलकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात आले.

डॉ.न.म.जोशी म्हणाले, न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रभावातून पुणे सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना झाली. सेवा व संस्कार हा दोन तत्वांविषयी कार्य करणा-यांप्रती पुरस्काराच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. सध्याचा काळ बदलला असून उत्तम कार्य करणा-या संस्था या उद्याचा आधार आहेत.

पुरस्काराला उत्तर देताना उमा माने म्हणाल्या, कोणतीही संस्था उभी करणे, ही टिकविणे व वाढविणे सोपे नाही. आज समाजात अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्याकडे बघणे गरजेचे आहे. धोरण, स्वप्न आणि दिशा या तीन गोष्टी सामाजिक कार्यात अत्यंत महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्याधरपंत नारगोलकर म्हणाले, समाजाला दिशा देण्यासाठी २ एप्रिल १८७० रोजी पुणे सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना झाली. संस्थेला १५२ वर्षे पूर्ण झाली असून १५३ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणा-यांना पुरस्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

अनिल शिदोरे म्हणाले, सामाजिक प्रश्न मांडण्यास व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रश्न सोडविण्यास व ते मांडण्यास संस्थेची स्थापना झाली. काळानुरुप प्रश्न बदलले असले, तरी देखील संस्थेचे कार्य अविरतपणे सुरु आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading