ऑलिंपिकमध्ये भारतीय तलवारबाज निश्चितच चांगली कामगिरी करतील – सतेज पाटील
पुणे : “भारतात आता तलवारबाजी या खेळास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर या खेळासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवरही भर दिला जात आहे. तलवारबाजी हा खेळ म्हणून युरोपियन देशात नावारूपास आला असला, तरी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सी ए भवानी देवी यांनी भारतीय खेळाडू देखील या खेळात चांगली कामगिरी करू शकतात हे सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळेच भारतीय तलवारबाज हे आगामी ऑलिंपिक स्पर्धेत व इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय तलवारबाजी महासंघ, महाराष्ट्र तलवारबाजी महासंघ व डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, आकुर्डी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेच्या निमित्ताने सतेज पाटील बोलत होते. ही स्पर्धा २५ ते २८ मार्च या कालावधीत महाळुंगे–बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न होत आहे. भारतीय तलवारबाजी महासंघाच्या अध्यक्षपदाची जवाबदारी स्वीकारण्याआधी सतेज पाटील यांनी महाराष्ट्र तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही बराच काळ काम पहिले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार या शस्त्राचे महत्त्व जाणत स्वराज स्थापनेच्या कार्यात मावळ्यांच्या हाती तलवार देत आपल्या लढ्याला सुरुवात केली. आज महाराष्ट्रात होत असलेली ही ३३ वी राष्ट्रीय स्पर्धा आमच्यासाठी भूषणावह आहे. खेळाडूंच्या आरोग्याला अधिक महत्त्व देत होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने पोषक आहार आम्ही उपलब्ध करून दिला आहे.”
या खेळासाठी संघटनेचे पुढील धोरण काय असेल याबाबत सतेज पाटील म्हणाले, “प्रत्येक राज्यामध्ये तलवारबाजी या खेळास अधिक प्रोत्साहन दिले जाईल, याबाबत संघटना आग्रही राहील. त्याचबरोबर महाराष्ट्रात ज्याठिकाणी तब्बल १,५०० तलवारबाजी करणारे खेळाडू आहेत, अशा राज्यात या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्णपणे ‘समर्पित’ स्वरूपातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. देशभरातील तलवारबाजी करणाऱ्या खेळाडूंना आवश्यक मदत मिळावी, हे एक मोठे आव्हान संघटनेसमोर आहे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंना दत्तक घ्यावे, अशा हेतूने काही योजना बनविण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर विविध माध्यमातून या खेळात नागरिकांचा विशेषत: पालकांचा सहभाग वाढविण्यावर आम्ही भर देणार आहोत. खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही कायमच प्रयत्न करू. मागील वर्षात महासंघाने देशभरात तब्बल ५० अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे उभारली असून येत्या वर्षात हा आकडा ७५ इतका असणार आहे. काही नव्या नियमांची अमंलबजावणी करणे हाही त्यातील एक महत्त्वाचा भाग असेल.”
तलवारबाजी या खेळाच्या प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या कार्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, “आज देशात इतर खेळांच्या बरोबरीने तलवारबाजी या खेळालाही लोकप्रिय बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या स्पर्धा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. याबरोबरच संस्था पातळीवर संघटनात्मक काम गरजेचे आहे असे मला वाटते. यादृष्टीने आम्ही काम सुरूही केले आहे.”