fbpx

कॉँग्रेस हादरली : आता राहुल गांधींना ‘या’ गोष्टीसाठी आली नोटीस

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेससाठी आणखी धक्कादायक बाब घडणार असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांना आता सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. त्यांना तशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आपल्यासाठी नवीन घर शोधाव  लागणार आहे. 

लोकसभा आवास समितीने राहुल गांधी यांना ही नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना देण्यात आलेला सरकारी बंगला सोडण्यात सांगण्यात आलं आहे. राहुल गांधी संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना बंगला खाली करण्याचे निर्देश या नोटिशीतून देण्यात आले आहेत. राहुल गांधी सध्या 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहत आहेत. त्यांना 30 दिवसात म्हणजे 22 एप्रिलपर्यंत बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिशीवर राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी नोटिशीला उत्तर देऊन बंगला खाली करण्यासाठी वेळ मागून घेतात की स्वत:हून बंगला सोडतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राहुल गांधी यांना 12 तुघलक लेनमधील सरकारी बंगला 2004मध्ये मिळाला होता. 2004मध्ये ते पहिल्यांदा अमेठीतून विजयी झाले होते. तेव्हापासून त्यांना हा बंगला देण्यात आलेला आहे.

राहुल गांधी यांना 30 दिवसात बंगला खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधी जास्तीत जास्त सहा महिने या बंगल्यात राहू शकतात. त्यासाठी त्यांना कमर्शियल रेंट द्यावं लागणार आहे. त्यासाठी त्यांना लोकसभेच्या आवास समितीला पत्र लिहून बंगला राहण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करावी लागणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेत काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला. अदानी प्रकरण आणि राहुल गांधी प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज काही तासांसाठी तहकूब करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: