fbpx

महिला सॅबर वैयक्तिक प्रकारात भवानी देवी ठरल्या राष्ट्रीय सुवर्णपदकाच्या मानकरी

पुणे : ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय तलवारबाज सी ए भवानी देवी यांनी ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत महिला सॅबर वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत केरळच्या व्ही सनी अल्का यांचा १५-९ गुणांनी पराभव केला.

भारतीय तलवारबाजी महासंघातर्फे महाराष्ट्र तलवारबाजी महासंघ व डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सहकार्याने पुण्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ते २८ मार्च या कालावधीत महाळुंगे–बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न होत आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा संचालनालयाचे उपायुक्त अनिल चोरमोले, भारतीय तलवारबाजी संघाचे कोषाध्यक्ष बशीर अहमद खान, सहसचिव देवेंद्र साहू, ज्येष्ठ सल्लागार अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी संघाचे सचिव उदय डोंगरे, कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे,कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी हे उपस्थित होते.

स्पर्धेत महिला सॅबर वैयक्तिक प्रकारात भवानी देवी यांनी आपले ११ वे राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळविले. उपांत्य फेरीत भवानी देवी यांनी पंजाबच्या जगमीत कौर यांच्यावर १५-११ अशी मात केली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत व्ही सनी अल्का यांनी हरियाणाच्या आखिरी यांचा १५-९ गुणांनी पराभव केला.

भवानी देवी यांना ६४ च्या फेरीत पुढे चाल ( वॉक ओव्हर) मिळाली. त्यानंतर ३२ च्या फेरीत भवानी देवी यांनी रितू प्रजापती यांचा १५-३ असा पराभव केला. १६ च्या फेरीत झालेल्या एकांगी लढतीत त्यांनी पंजाबच्या हुसनप्रीत कौर यांचा १५-२ असा पराभव केला. तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी रिषिका खजूरिया यांचा १५-७ गुणांनी पराभव केला.

स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महिला इपी प्रकारात हरियाणाच्या प्राची लोहान यांनी सुवर्ण पदक पटकाविले.

महिला वैयक्तिक फॉइल प्रकारात केरळच्या राधिका प्रकाश अवटी यांनी केरळच्याच व्ही पी कनगालक्ष्मी यांचा १५-८ असा पराभव करत, सुवर्णपदक पटकाविले. उपांत्य फेरीत राधिका प्रकाश अवटी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या रिया बक्षी यांचा १५-६ गुणांनी पराभव केला. तर  व्ही पी कनगालक्ष्मी यांनी मीना नाओरेम यांचा १५-७ असा पराभव करत, अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

स्पर्धेत महिला सांघिक सॅबर प्रकारात तामिळनाडू विरुद्ध केरळ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात तामिळनाडू संघाने केरळ संघावर ४५-३४ असा विजय मिळविला.  तामिळनाडूच्या संघात सीए भवानी देवी, जे एस जेफरलीन, एम आर बेनी क्युएबा एम तामीळ सेल्वी यांचा, तर केरळ संघातर्फे व्ही सनी अल्का, जोस्ना ख्रिस्ती, एस सौम्या, रीशा पुथूसरी यांचा समावेश होता. तामिळनाडू संघाच्या विजयामुळे भवानी देवी यांना एकाच स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक आपल्या नावावर करण्याचा बहुमान मिळाला. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत केरळ संघाने महाराष्ट्राच्या संघाचा ४५-३९ गुणांनी पराभव केला. तर तामिळनाडूच्या संघाने पंजाबच्या  संघाचा ४५- २२ गुणांनी पराभव केला.

स्पर्धेत पुरुषांच्या फॉइल वैयक्तिक सामना प्रकारात, मणिपूरच्या हेमाश सनासम यांनी सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या (एसएससीबी च्या इस्माईल मोहम्मद खान यांचा १३-१२ असा पराभव करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. सनासम यांनी उपांत्यफेरीत आकाश कुमारचे (१५-१३) आव्हान मोडून काढत, अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर उपविजेते  इस्माईल मोहम्मद खान यांनी उपांत्य फेरीत देव यांचा १५-१४ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.


३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत आज २०२२ च्या समर पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळातील पुरुष एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक विजेते खेळाडू प्रमोद भगत आणि आशियाई पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळातील विजेते असलेले खेळाडू शुकांत कदम यांनी भेट दिली. यावेळी भारतीय तलवारबाजी महासंघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष बशीर अहमद, भारतीय तलवारबाजी महासंघाचे सहसचिव देवेंद्र साहू, महाराष्ट्र तलवारबाजी महासंघाचे सचिव उदय डोंगरे, दिल्ली तलवारबाजी असोसिएशनचे सचिव हरप्रित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

फेरीनिहाय निकाल :
* महिला सॅबर (वैयक्तिक)
– अंतिम फेरी
भवानी देवी वि. वि.व्ही सनी अल्का (१५-९)

– उपांत्य फेरी
भवानी देवी वि. वि. जगमीत कौर (१५-११)
व्ही सनी अल्का वि. वि. आखिरी (१५-९ )

* महिला फॉइल (वैयक्तिक)
– अंतिम फेरी
राधिका प्रकाश अवटी वि.वि. व्ही पी कनगालक्ष्मी (१५-८ )
– उपांत्य फेरी ‘
राधिका प्रकाश अवटी वि.वि. रिया बक्षी (१५-६)
व्ही पी कनगालक्ष्मी वि.वि. मीना नाओरेम (१५-७)

* महिला सॅबर (सांघिक)
– अंतिम फेरी
तामिळनाडू विरुद्ध केरळ (४५-३४)
– उपांत्य फेरी
तामिळनाडू विरुद्ध पंजाब (४५- २२)
केरळ विरुद्ध महाराष्ट्र (४५-३९ )

* पुरुष फॉइल (वैयक्तिक)
– अंतिम फेरी
हेमाश सनासम वि. वि. इस्माईल मोहम्मद खान (१३-१२ )
-उपांत्य फेरी
हेमाश सनासम वि. वि. आकाश कुमारचे (१५-१३)
इस्माईल मोहम्मद खान वि. वि. देव (१५-१४ )

Leave a Reply

%d bloggers like this: