fbpx

वालेकर स्पोर्ट्स संघाने उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत वालेकर स्पोर्ट्स संघाने हेज अँड सॅचे क्लब संघाचा चार गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या उद्धघाटनाचा दिवस गाजवला.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत तन्मय देशपांडेच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर वालेकर स्पोर्ट्स संघाने पहिला विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेज अँड सॅचे क्लबने २० षटकात १५१ धावा धावफलकावर लावल्या. मुस्ताक शेख याने ६५ धावांची खेळी केली. विश्‍वास शिंदे (२६ धावा) आणि दत्ता पवार (२२ धावा) यांनी धावांचे योगदान देत डावाला आकार दिला. तन्मय देशपांडे याने १६ धावात ३ गडी टिपले. हे आव्हान वालेकर स्पोर्ट्स संघाने २० व्या षटकात ४ गडी राखून पूर्ण केले. तन्मय देशपांडे (३१ धावा), विशाल गव्हाणे (२७ धावा) आणि शुभम खटाळे (नाबाद ४० धावा) यांनी धावा जमवित संघाचा विजय सोपा केला.

स्पर्धेचे उद्धघाटन भारतीय क्रिकेटपटू व आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुनित बालन ग्रुपचे प्रशांत स्वामी, संतोष शहा, प्रविण रत्नपारखी, अभय जाजू, अक्षय जाधव, आंनद ओझा, रोहीत फुंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत एकूण चार लाख रूपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये व करंडक मिळणार आहे.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
हेज अँड सॅचे क्लबः २० षटकात १० गडी बाद १५१ धावा (मुस्ताक शेख ६५ (४४, १० चौकार, १ षटकार), विश्‍वास शिंदे २६, दत्ता पवार २२, तन्मय देशपांडे ३-१६, हरीष सी. २-२९) पराभूत वि. वालेकर स्पोर्ट्सः १९.४ षटकात ६ गडी बाद १५४ धावा (तन्मय देशपांडे ३१, विशाल गव्हाणे २७, शुभम खटाळे नाबाद ४०, मुस्ताक शेख ३-३३, दत्ता पवार २-२५); सामनावीरः तन्मय देशपांडे;

Leave a Reply

%d bloggers like this: