वृक्षविद्रुपीकरण कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष : सचिन काळभोर
पुणे : शहरी भागात डांबरीकरण, काँक्रिटीकरणामुळे जमिनीची पाझर क्षमता शून्यावर आली आहे. वृक्षांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असल्याने भविष्यात तापमान बदल हे खूप मोठे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. वृक्षलागवड, संगोपन आणि विद्रुपीकरण याविषयी कायदे आहेत; परंतु या कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाही, अशी टीका ‘खिळेमुक्त झाडं’ अभियान यशस्वीरित्या राबविणारे सचिन काळभोर यांनी केली. गेल्या दहा वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका एकाच खड्ड्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत असल्याचे वास्तवही त्यांनी दर्शविले.
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे आज (शनिवारी) ‘झाड’ या विषयावर कविसंमेलन व काळभोर यांचा विशेष सन्मान अभिनेत्री-कवयित्री भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शाल आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष मैथिली आडकर व्यासपीठावर होते.
वृक्ष लागवड आणि संवर्धनाकडे स्थानिक प्रशासन पुरेसे लक्ष देत नाही. मात्र झाड पडल्यानंतर ते छाटण्यासाठी अद्ययावत यंत्रणेसाठी लाखो रुपये खर्च केले जातत, असे सांगून काळभोर म्हणाले, वृक्षलागवड करीत असताना देशी वाण न वापरता परदेशी जातीची झाडे लावली जातात. नैसर्गिक आपत्तीत ही झाडे तग धरून राहत नाहीत, हे अनेकदा निदर्शनास आले आहे. विविध पद्धतीने झाडांचे विद्रुपीकरण होत असताना सामान्य नागरिक या विषयी जागरूक नसतो. सर्वसामान्यांनी आवज उठविल्यास विद्रुपीकरणाला आळा बसू शकतो. झाडांना खिळे मारून जाहिराती किंवा विद्रुपीकरण केल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती दिली तर त्याविरोधात उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला जाऊ शकतो. ‘खिळेमुक्त झाडं’ या अभियानाअंतर्गत साडेचार लाखांपेक्षा जास्त खिळे काढले आहेत. केवळ 15 लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या अमियानात तीन हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते जोडले गेले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. झाडे फक्त देणे जाणतात. मानवाला झाडांची महती लक्षात येत नाही. झाडांनी जर संप केला तर मानवी जीवन संपुष्टात यायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सामान्य माणसाने देशी झाडे लावून त्याचे संवर्धन करणे या परिवर्तन कार्यात ठामपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे काळभोर म्हणाले. ‘सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजुन येणं’ या काव्यपंक्तीने त्यांनी मनोगताचा समारोप केला.
भाग्यश्री देसाई म्हणाल्या, पर्यावरण क्षेत्रात काळभोर यांचे कार्य खूप मोलाचे असून अशा स्वरूपाचे कार्य करण्यास आंतरिक इच्छा, उर्मी, प्रामाणिकपणा असे वेड अंगी असणे आवश्यक आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील रत्ने शोधून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे आडकर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कर्तृत्ववान व्यक्तींचे कार्य समाजासमोर आणून त्याद्वारे समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले. सन्मानपत्राचे लेखन प्रभा सोनवणे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात माधव हुंडेकर, शैलजा किंकर, मीरा शिंदे, स्वाती सामक, प्रभा सोनवणे, वर्षा कुलकर्णी, राजश्री सोले, श्रीकांत वाघ, अंजली देसाई, निरुपमा महाजन, वासंती वैद्य, सुजित कदम, सीताराम नरके, डॉ. राजश्री महाजनी, सुनीति लिमये, प्रमोद खराडे यांचा सहभाग होता. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन तनुजा चव्हाण यांनी केले.