नवीन मराठी शाळेची इमारत शताब्दी वर्षात
पुणे : हेरिटेज दर्जा असलेल्या नवीन मराठी शाळेच्या इमारतीला आज शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दीपोत्सव आणि रोषणाई करण्यात आली होती. शाळा यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
डी ई एस चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, स्थापत्य विशारद रवींद्र कानडे, ज्योतीप्रकाश सराफ, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, माधवराव नामजोशी, गोपाळ गणेश आगरकर या थोर समाजसुधारकांनी १८८० मध्ये पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. मोरोबादादांचा वाडा, गद्रे वाडा अशा ठिकाणी शाळा भरू लागली. अल्पावधीत विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने व या शाळेस पूरक म्हणून इ.१ली ते ४ थी ची प्राथमिक शाळा स्वतंत्र असावी असे ठरले. ठरवल्याप्रमाणे ४ जानेवारी १८९९ मध्ये ‘नवीन मराठी शाळा’ नावाने होळकर वाड्यात शाळेचा नव्याने श्रीगणेशा झाला.
म.धोंडे केशव कर्वे हे शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून लाभले. अनेक थोर कर्तृत्ववान मुख्याध्यापकांची व सुपरिटेंडेंट यांची परंपरा शाळेस लाभली. या प्रत्येकाच्या कालावधीत शाळेने त्या काळातील ‘ एक आदर्श प्राथमिक शाळा ‘ असा नावलौकीक मिळवला . डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ही शाळा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना शाळेच्या मुख्य इमारतीस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. असे दुहेरी ऐतिहासिक क्षण एकत्रित आले आहेत. ब्रिटिश कालीन मोठी दगडी इमारत, इंग्रजांच्या बांधकाम शैलीची छाप पूर्णतः या इमारतीवर दिसून येते. ओतीव लोखंडी गोलाकार मोठे खांब, अर्धगोलाकार कमानी, मोठ्या लोखंडी तुळया, उतरते कौलारू छप्पर, प्रशस्त आवार, प्रशस्त वर्ग, त्यात हवा उजेडासाठीचे झरोके, लाकडी व दगडी जिने, रोझ विंडो मधील घड्याळ, मोठा प्रार्थना हॉल, शालेय बाग, वृक्षसंपदेने बहरलेला परिसर हे देखणेपण आजही शाळा टिकवून आहे.