fbpx

अभिनेते क्षितीश दाते व ऋचा आपटे-दाते यांच्या हस्ते कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ची उभारणी

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कोथरूड शाखेतर्फे पुण्याचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेते क्षितीज दाते व सौ. ऋचा आपटे-दाते यांच्या हस्ते कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ उभारण्यात आली. गेली १० वर्षे हा उपक्रम चालू आहे. या प्रसंगी अ.भा. भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचे अध्यक्ष व संयोजक सुनील महाजन, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, पिंपरी-चिंचवड नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, तळेगाव-दाभाडे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, नाट्य व्यवस्थापक समीर हम्पी आणि सत्यजित धांडेकर, नाट्यगृहांचे व्यवस्थापक विजय शिंदे, बालरंग भूमीचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांबरोबरच अनेक नामवंत कलावंत, बॅक स्टेज आर्टिस्ट, नाट्यगृहांशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संयोजकांना धन्यवाद देऊन क्षितीज दाते म्हणाले कि, ‘दरवर्षी नवीन नाटकांची गुढी यानिमित्त उभारली जाते. कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ ही महाराष्ट्रात केवळ पुण्यातच उभारली जाते हे विशेष आहे. पुण्याप्रमाणेच कोथरूड परिसर देखील आता सांस्कृतिक उपक्रमांचे मोठे केंद्र बनले आहे. किंबहुना कोथरूडला सांस्कृतिक उपक्रमांचे माहेरघरंच मानले जाते. पुण्यात नाटकांना मोठा प्रतिसाद मिळतो त्यामुळे आम्हा कलाकारांचा हुरूप वाढतो असे ते म्हणाले.

पुणे महानगरपालिकेतर्फे सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देऊन नेहमीच मदत केली जाते व यापुढेही केली जाईल असे याप्रसंगी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगून म्हंटले की, ‘पुण्याची शान असणारे बाल गंधर्व रंग मंदिर देखील लवकरच नव्या व आकर्षक स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या समोर येईल.’

कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे शेजारी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह पुणे महानगरपालिकेतर्फे उभारले जात असून त्याचे उद्घाटन लवकरच होईल. नाट्य रसिकांची मोठी गरज त्यामुळे भागेल असे शिवसेना (ठाकरे गट) मनपा गट प्रमुख पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

या प्रसंगी अ. भा. मराठी मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक सुनील महाजन यांनी प्रास्ताविक, समीर हम्पी यांनी स्वागत, सुनील महाजन यांनी सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन सत्यजित धांडेकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: