Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

तुळशीबागेतील २६२ व्या श्रीरामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ

पुणे :श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने बुधवार, दिनांक २२ मार्च ते रविवार, दिनांक ९ एप्रिल दरम्यान श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामकथा प्रवचन, कीर्तन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले यांनी दिली.

संस्थानचे विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६२ वे वर्ष साजरे होत आहे.

गुढीपाडव्याला बुधवार, दिनांक २२ मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्यादिवशी सकाळी ७ पासून श्रीरामास पवमान अभिषेक, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण होणार आहे. तसेच दि. २२ ते २९ मार्च दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी यांचे सुश्राव्य रामकथा प्रवचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे. तर, दिनांक २२ ते २९ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजता प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

बुधवार, दिनांक २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता श्री कौसल्या माता डोहाळजेवण होणार आहे. श्रीराम जन्मानिमित्त गुरुवार, दिनांक ३० मार्च सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे.

शनिवार, दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. गुरुवार, दिनांक ६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.विकासबुवा दिग्रसकर यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. रविवारी, दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीरामजन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.

  • सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नवोदितांसह दिग्गज कलाकारांची गायनसेवा – उत्सवादरम्यान बुधवार, दिनांक २२ मार्च रोजी पं.समीर दुबळे यांचे सुश्राव्य गायन, शुक्रवार, दिनांक २४ मार्च रोजी पं.आनंद भाटे यांचे गायन आणि मंगळवार, दिनांक २८ मार्च रोजी पं.रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सभामंडपात होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीपाद तुळशीबागवाले यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading