fbpx

अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणात सनदी लेखापालांचे भरीव योगदान – सतीश मराठे

पुणे : “भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असून, यामध्ये बँकिंग व्यवस्थेचे व सनदी लेखापालांचे भरीव योगदान आहे. पारदर्शी, सुरक्षित आर्थिक व्यवहारासाठी लेखापरीक्षण बारकाईने करावे. ब्रांच स्तरापासून केंद्रीय स्तरापर्यंत अचूक व पारदर्शी लेखापरीक्षणात सनदी लेखापाल महत्वाची भूमिका बजावत आहे,” असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) ऑडिटिंग अँड ऍशूरन्स स्टँडर्ड बोर्ड आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘स्टॅच्युटरी ऑडिट ऑफ बँक ब्रांचेस’ वरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी श्री. मराठे बोलत होते. कोथरूड येथील एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात ही दोन दिवसीय परिषद होत आहे.

उद्घाटनावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सीए रंजन कुमार शर्मा, आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, सचिव सीए अजिंक्य रणदिवे, खजिनदार सीए हृषिकेश बडवे सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए सचिन मिणियार, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते.

सतीश मराठे म्हणाले, “येणाऱ्या काळात वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी बँकिंग व्यवस्था सक्षम व पारदर्शी असावी, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शिका, तसेच बँकांचे ‘रिस्क बेस ऑडिट’ धोरण प्रभावीपणे राबवली पाहिजे. त्यातून आर्थिक धोका टाळता येईल. लेखापरीक्षकानी निर्भीडपणे लेखापरीक्षण करताना संबंधित संस्थेला आर्थिक त्रुटी किंवा गैरप्रकार असतील, तर त्याविषयी अवगत करावे. अहवालात तसे स्पष्टपणे नमूद करावे.”

“बँकांचे ग्राहक, भागधारक व बँकेशी संबंधित सर्वांना वचननिश्चिती (अशुरन्स कम्फर्ट) देण्यासाठी प्रयत्नशील असावे. त्यातून बँकांवरील ग्राहकांचा विश्वास अढळ राहील, तसेच अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल. जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमतेसारखे नवतंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.” असेही मराठे यांनी नमूद केले.

सीए रंजन कुमार शर्मा म्हणाले, “आर्थिक गैरव्यवहारात कंपनीच्या संचालक, कर्मचारी यांच्यासह लेखापरीक्षकाचे नाव घातले जाते. हे टाळण्यासाठी लेखापरीक्षकांनी ‘वॉचडॉग’ची भूमिका बजवावी. लेखापरीक्षण करताना निरीक्षण परखडपणे नोंदवावीत, जेणेकरून भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “बँकांचे लेखापरीक्षण करताना नेमकी काय काळजी घ्यावी, याचे ज्ञान देणारी ही परिषद आहे. बँकेची पत, आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्याची भूमिका लेखापरीक्षक बजावत असतो. त्यामुळे लेखापरीक्षण करताना स्पष्टता असणे आवश्यक आहे.”

सीए राजेश अग्रवाल म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याचे दायित्व सनदी लेखापालांवर आहे. बदलत्या आर्थिक स्थितीचे, प्रणालींचे अवलोकन त्यांना व्हावे, या दृष्टीने आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने सातत्याने नावीनपूर्ण व उपयुक्त असे उपक्रम राबविले जात आहेत.”

सीए प्रितेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. सीए अजिंक्य रणदिवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: