fbpx

इंद्रायणी नदीत सहकुटुंब जलसमाधी घेण्याचा सुधीर जगताप यांचा इशारा

संधीसाधूंचा महार वतनाच्या जमिनीवर ‘डल्ला’

पिंपरी – केळगाव, राजगुरुनगर येथील महार वतनाच्या वडिलोपार्जित शेतजमीनवर महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदा कब्जा केला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी खेड, तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आपण सहा एप्रिल २०२३ रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी पात्रात सहकुटुंब जलसमाधी घेणार आहोत, असा इशारा सुधीर लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सुधीर जगताप हे अंध असून त्याचा गैरफायदा घेतला जातो. जगताप यांची मौजे केळगाव, आळंदी, राजगुरुनगर येथे गट नं. ५१, ५२, ५३, ५४, ५५ व ४०४, ४०८ जमीन वडिलोपार्जित शेतजमीन आहे. ही जमीन महार वतनाची आहे. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून अब्दुल अब्बास अली शकूर चौधरी, अमन देवीचंद अग्रवाल, गजानन रामप्रभू तराळे, जावेद शकूर चौधरी तसेच महादेव चव्हाण व इतरांनी जबरदस्तीने कब्जा करून तारेचे कुंपण घातले आहे.

तसेच केळगाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी आळंदी यांनी जमिनीतील काही क्षेत्र ऑनलाईन सातबारा व ८अ च्या उता-यावर कमी केले असून मूळ गट नं. ५१ च्या सातबारा पत्रकी हिस्सा एक आणा सहा पै. असताना जाणीवपूर्वक गट नं. ५१/२/१ मधील ऑनलाईन सातबारा व ८अ चा उतारा देत नाही. मूळ गट नं. ५१ पूर्वी अधिकार अभिलेखामध्ये सुधीर जगताप यांचे सख्खे चुलत आजोबा गणा मारुती महार जगताप यांच्या नावे गट नं. ५१ मध्ये व ५१/२/१ मध्ये एक आणा सहा पै. हिस्सा दाखल आहे, असे जगताप यांनी पत्रात नमूद केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. चुकीचे शेरे काढून माझ्या व कुटुंबियांची नावे आणेवारी प्रमाणे क्षेत्र ऑनलाईन सातबारा उता-यावर लावावे. अन्यथा तीर्थक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी पात्रात ६ एप्रिल (गुरुवार) २०२३ रोजी सहकुटुंब जलसमाधी घेण्याचा इशारा सुधीर जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. याबाबत जगताप यांनी पुणे जिल्हाधिकारी, खेड तहसीलदार, उपविभागीय अधिकारी जुन्नर, भुमी अभिलेख कार्यालय खेड, पोलिस उपायुक्त पिंपरी चिंचवड यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे. या विषयावर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सुधीर जगताप म्हणाले की, महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच भूमाफिया आणि पोलीस प्रशासन यांची अभद्र युती झाल्यामुळे माझ्यासारख्या मागासवर्गीय नागरिकांवर अन्याय अत्याचार होत आहेत. मला न्याय मिळावा म्हणून मी शासन दरबारी व मसूर कार्यालयात अनेक कल्पटी मारून प्रयत्न केले आहेत आता माझी व माझ्या कुटुंबीयांची सहनशीलता संपली आहे त्यामुळे आम्ही आता जलसमाधीच्या निर्णय घेत आहोत असेही जगताप यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: