fbpx

पुणेकरांनी अनुभवला प्राचीन सिंधू संस्कृती ते भारतीय नौदलापर्यंतचा समृद्धशाली इतिहास

पुणे- प्राचीन भारतीय पराक्रमी राजवंश, सातवाहन साम्राज्य, चोल साम्राज्य, कदंब, शिलाहार, यादव राजवंश या प्राचीन सम्राटांचे समुद्रामध्ये हुकूमत गाजवणारे बलाढ्य आरमार… समुद्र सुरक्षेचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर उभे केले गौरवशाली आरमार… त्या आरमारातील गलबत, गुराब, शिबाड, पाल ते आजचे विक्रांत या लढाऊ जहाजांची प्रतिकृती… अशा प्राचीन सिंधू संस्कृती ते भारतीय नौदलापर्यंतचा वैभवशाली समृद्ध प्रवास पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढावू जहाजांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन. यावेळी प्राचीन सिंधू संस्कृती ते भारतीय नौवदलांपर्यंतच्या लढावू जहाजांची माहिती आणि इतिहास पुणेकरांनी अनुभवला.

प्रदर्शनात गलबत, गुराब, शिबाड, पाल, पोर्तुगीज जहाज, ते आजचे विशाखापट्टनम, विक्रांत यांसारखी लढावू जहाजांची प्रतिकृती प्रदर्शनात पाहायला मिळाली. त्याचबरोबर प्राचीन भारताची सिंधू संस्कृती, सातवाहन साम्राज्य, मराठा साम्राज्याचा इतिहास पाहण्याची संधी पुणेकरांनी घेतली. चित्रकार विजय महामुलकर, कुमार गुरव, इतिहास अभ्यासक रोहित कांबळे यांसह सजावट संदीप गायकवाड यांनी केली होती.

मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी म्हणाले, सिमा सुरक्षेची दूरदृष्टी ठेवून कौशल्याच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूस्थानात मराठा आरमार दलाची स्थापना केली. इंग्रज- डच, फ्रेंच पोर्तुगीज या दर्यावर्दी युरोपीय सत्ता आणि सिद्दी, मुघलांसारख्या सुलतानांना ज्याचा समुद्रावर धाक होता असे गौरवशाली मराठा आरमार होते. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आरमाराचा इतिहास आणि त्यातील लढावू जहाजांची माहिती सर्वसामान्यांना कळावी यासाठी लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: