राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने सर्पमैत्रिणींचा सन्मान
पुणे : साप म्हटल्यावर वाटणारी भिती…सापाबाबत समाजात पसरलेल् या अंधश्रद्धा…सर्पमित्र म्हणून पहिल्यांदाच ११ फूटी साप पकडताना आलेला अनुभव…समाजाचा महिला सर्पमित्राकडे बघण्याचा दृष्टीकोन…साप पकडणे हे स्टंट नाही त्यामुळे कोणतीही माहिती नसताना साप पकडायला जाऊ नका, निसर्गाचा आदर करा असे सांगत नाग, मण्यार, घोणस,धामण अशा विविध सापांची रंजक माहिती सर्पमैत्रिणींनी उपस्थितांना दिली.
निमित्त होते, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित सर्पमैत्रिणींच्या अर्थात साप पकडणाऱ्या महिलांच्या सन्मानाचे. शुक्रवार पेठेतील अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील यांच्या हस्ते सर्पमैत्रिणींचा सन्मान करण्यात आला. यावेळी अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त विश्वास भोर, राजाभाऊ बलकवडे, अकादमीचे संचालक सुनिल सोनटक्के ,रोमा लांडे,अमर लांडे, गणेश माने ,सुप्रिया मुरमुरे,अक्षय खिंवसरा ,अश्विनी बैकर ,किरण फाळके,संतोष गवारे ,गौरव निविलकर, मनोज गवळी, प्रशिक्षक आणि सभासद यावेळी उपस्थित होते.
नारायणपूर येथील सुजाता बोरकर, निगडी प्राधिकरण मधील निलिमा भावे, वाकड येथील काजल वाकडकर, कोथरुडच्या इंदिरा भिलारे या सर्पमैत्रिणींचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.