National Badminton Tournament: मिथुन, अनुपमा नवे राष्ट्रीय विजेते
पुणे – रेल्वेचा मंजुनाथ मिथुन आणि हरियानाची अनुपमा उपाध्याय वरिष्ठ गटाच्या ८४व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील (National Badminton Tournament) पुरुष, महिला गटाचे नवे राष्ट्रीय विजेते ठरले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत मिथूनने सहजगत्या विजेतेपदाला गवसणी घातली, तर अनुपमाला विजयासाठी आकर्षिचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने योनेक्स सनराईज ८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडली. यावेळी केंद्रीय क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद, रणजीत सिंग देवल, शेखर सिंग, सुहास दिवसे, अरुण लाखानी, एस.मुरलीधरन, ओमर राशीद, श्रीकांत वाड, सदाशिव नातू, रणजीत नातू, सुशिल जाधव, अजित गाडगीळ, विशाल देशमुख, विक्रम धार, जसविंदर नारंग, गिरीश नातू, आनंद जोशी, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते.

पुरुष आणि महिला एकेरीतील खेळाडूंना समान बक्षीस रक्कम देण्यात आली. एकेरीतील विजेत्याला ३ लाख २५ हजार रुपये, तर उपविजेत्याला १ लाख ७० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या खेळाडूला १ लाख २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील जोड्यांना समान बक्षीस रक्कम देण्यात आली. यातील दुहेरीतील विजेत्यास ३ लाख ४५ हजार रुपये, उपविजेत्या जोडीस १ लाख ७० हजार रुपये दिले गेले. उपांत्य फेरीतील विजेत्यास १ लाख २२ हजार रुपये देण्यात आले.
पुरुष एकेरीतील विजेत्याला दाजीसाहेब नातू करंडक, महिला एकेरीतील विजेत्याला अविनाश वारदेकर करंडक, पुरुष दुहेरीतील विजेत्यास भाऊसाहेब मेहेंदळे करंडक, महिला दुहेरीतील विजेत्यास प्रिन्सिपल एन. जी. सुरू करंडक, मिश्र दुहेरीतील विजेत्यास मकरंद भावे करंडक देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्यांनाही आकर्षक करंडक देण्यात आले. विजेत्यांना देण्यात आलेल्या चषकात चांदीचे शटल देखील होते. दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशनकडून हे सर्व करंडक देण्यात आले.
मिथूनने मध्य प्रदेशाच्या प्रियांशु राजावतचा २१-१६, २१-११ असा सहज पराभव केला. महिला एकेरीत अनुपमाने छत्तीसगडच्या आकर्षि कश्यपचे आव्हान २०-२२, २१-१७, २४-२२ असे तीन गेमच्या लढतीत मोडून काढले. महाराष्ट्राला दुहेरीत अखेरची संधी होती. मात्र, अक्षन शेट्टी-दीप रांभिया जोडीचा प्रतिकार कर्नाटकच्या कुशल-प्रकाश जोडीपुढे तोकडा पडला.
स्पर्धेत पहिल्या लढतीपासून लयीत खेळणाऱ्या मिथुनचा आत्मविश्वास दुसऱ्या मानांकित किदाम्बी श्रीकांतला उपांत्य फेरीत हरवल्यानंतर अधिक उंचावला होता. थॉमस करंडक विजेत्या संघातील प्रियांशु राजावतविरुद्ध अंतिम लढत खेळताना याचा प्रत्यय सातत्याने येत होता. त्यामुळेच पहिल्या गेममधील बरोबरीतल्या स्थितीनंतर एकवेळ ९-१० अशा मागे पडलेल्या मिथूनने सलग पाच गुणांची कमाई करताना १४-१० अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर मिथूनने १४-११, १५-१२, १६-१३, १७-१५ अशी एक दोन गुणांची आघाडी कायम राखली.
मिथूनने १८-१६ अशा स्थितीनंतर मिथूनने झटपट तीन गुणांची कमाई करत पहिला गेम सहज जिंकला. दुसरा गेमही सुरुवातीच्या बरोबरीच्या स्थितीतही मिथूनचे वर्चस्व सिद्ध करणारा ठरला. गेमच्यामध्यात मिथूनने ११-८ अशी आघाडी मिळवत ती सातत्याने वाढवतच नेली. गेमच्या उत्तरार्धात मिथूनचा खेळ इतका वेगवान झाला की प्रियांशूला केवळ तीनच गुणांची कमाई करता आली. मिथूनने अगदी सहज गेम खिशात टाकताना पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
महिला एकेरीत अनुपमा उपाध्यायचा अनुभव एक पाऊल पुढे ठरला. पहिली गेम अगदी अखेरच्या क्षणात जिंकून सनसनाटी सुरुवात करणाऱ्या आकर्षिला नंतर अनुपमाच्या खेळाचा सामना करता आला नाही. अनुपमाने ३-१ अशा सुरुवातीनंतर सलग पाच गुणांची कमाई करताना ८-१ अशी मोठी आघाडी घेतली. नियंत्रित फटके आणि अचूक प्लेसमेंट हे अनुपमाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. या गेमला सुरुवातीलाच मिळविलेली आघाडी अनुपमाने क्वचितच गमावली. गेमच्या मध्याला अनुपमाकडे ११-६ अशी मोठी आघाडी होती.
उत्तरार्धाच्या खेळात आकर्षिने अनुपमाला गाठण्याचा प्रयत्न केला. पण, तो फोल ठरला. तिसऱ्या निर्णायक गेमला मात्र आकर्षिने अगदी अखेरच्या टप्प्यात आपला खेळ उंचावल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली होती. त्यामुळे ४-२, १०-६, ११-६, १५-१० अशा आघाडीनंतरही आकर्षिने सलग पाच गुण घेत पिछाडी भरून काढत १९व्या गुणाला बरोबरी साधून एकवेळ २०-१९ अशी आघाडी घेतली. मात्र, मॅचपॉइंट साधण्यात आकर्षिला अपयश आले. अनुपमा पुन्हा एकदा २२-२१ अशा आघाडीवर गेली. पण, पुन्हा एकदा आकर्षिने बरोबरी साधली. या वेळी मात्र अनुपमाने सलग दोन गुण घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत १ तास १८ मिनिटे रंगली.
मिश्र दुहेरीत हेमनागेंद्र बाबू आणि कनिका कन्वल या रेल्वेच्या जोडीने तेलंगणाच्या सिद्धार्थ एलान्गो आणि दिल्लीच्या खुशी गुप्ता जोडीचा २१-१७, २१-१६ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. महिला दुहेरीत अव्वल मानांकित केरळची त्रिशा जॉली आणि तेलंगणाच्या गायत्री गोपीचंद जोडीने दिल्लीच्या काव्या गुप्ता-दीपशिखा सिंगला संधीच मिळू दिली नाही. त्रिशा-गायत्रीने २१-१०, २१-९ अशी अंतिम लढत सहज जिंकली. पुरुष दुहेरीत कर्नाटकच्या कुशल-प्रकाश राज जोडीने महाराष्ट्राच्या दीप रांभिया-अक्षन शेट्टी जोडीचे आव्हान ८-२१, २१-१९, २१-८ असे संपुष्टात आणले.
