fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

शहराच्या मध्यवर्ती भागात संविधान शिल्प उभा करावे ; सुनील माने यांची आयुक्तांकडे मागणी

पुणे : देशातील नागरिकांना एकता आणि अखंडता प्राप्त करून देणाऱ्या संविधानाची प्रतिकृती पुणे शहरातील मध्यवर्ती भागात उभा करावी, अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांना दिले.

यावेळी त्यांच्या सोबत सुनील दैठणकर, जितेंद्र गायकवाड, अनिल माने आदी उपस्थित होते.

लोकशाही, मूलभूत मानवी अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा मौलिक दस्तावेज म्हणजे आपली भारतीय राज्यघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान देशाला बहाल केले आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान देशाला लागू झाले. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत. संविधानामुळे देशाची एकता आणि अखंडता टिकून आहे. देशाचा राज्यकारभार तसेच प्रशासकीय कारभार संविधानानुसार चालतो त्यामुळे संविधानाला देशाचे राष्ट्रग्रंथ म्हंटले जाते. यामुळे संविधानाला अनन्य साधारण महत्व आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधानापैकी एक आहे. सध्या देशभरात संविधान ही एक चळवळ बनली आहे.

त्यामुळे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, त्याचे महत्व प्रत्येक भारतीयाला कळावे या उद्देशाने भाजपा सत्तेत असताना नागपूर महानगरपालिकेमार्फत संविधान चौक येथे संविधान उद्देशिका शिल्प उभा करण्यात आले. याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेमार्फत शहराच्या मध्यवर्ती भागात संविधान शिल्प उभारण्यात यावे. अशी मागणी सुनील माने यांनी या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading