मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ‘नवरंग रुपेरी’स प्रदान
मुंबई- मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ काल संपन्न झाला. या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये ‘नवरंग रुपेरी-२०२२’ ( Navarang Ruperi)या दिवाळी अंकाला कलाविषयक ‘उत्कृष्ट दिवाळी अंक‘ हा सन्मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काल मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील दादर सार्वजनिक वाचनालयात हा समारंभ संपन्न झाला.
महाराष्ट्र भरातून या स्पर्धेसाठी एकूण १४० अंकांनी सहभाग नोंदवला होता. विविध क्षेत्रांना समर्पित २५ अंकांना यावेळी गौरविण्यात आले व त्यापैकी चित्रपट व कला या क्षेत्रातील अंकांमधून नवरंग रुपेरी ची उत्कृष्ट अंक म्हणून निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक पद्मश्री डॉ तात्याराव लहाने व विख्यात न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांच्या तर्फे नवरंग रुपेरीचे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारतांना नवरंग रुपेरी चे स्तंभ लेखक आशिष देवडे यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमास मनशक्ती केंद्र, लोणावळा चे विश्वस्त प्रमोद शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे व उद्योजक किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे यांच्या रंगभूमीवरील सादरीकरण तसेच कवयित्री अनघा तांबोळी यांच्या काव्यवाचनाने झाली. दीपप्रज्वलनानंतर लेखक संघाचे माजी प्रमुख कार्यवाहक दिवंगत शरद वर्तक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रमुख अतिथींचे स्वागत केले. यानंतर वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कार व ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब यांना सेवावती सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१९८७ सालापासून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या नवरंग रुपेरी या दिवाळी अंकांने आजवर ४० हुन अधिक अनेक मान्यवर संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. या वर्षी दिवाळी अंकाचे हे ३६ वे वर्ष आहे. सलग ३६ वर्ष चित्रपटविषयक दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा सन्मान या दिवाळी अंकाला प्राप्त झाला आहे. जेष्ठ चित्रपट अभ्यासक आणि सिने-पत्रकार श्री अशोक नारायण उजळंबकर हे अंकाचे मुख्य संपादक आहेत तर ज्येष्ठ सिने-अभ्यासक धनंजय कुलकर्णी हे या अंकाचे निवासी संपादक आहेत.
