आई-वडिलांचे पूजन करुन चिमुकल्यांनी व्यक्त केले प्रेम
पुणे : जगात सर्वत्र गुलाब देऊन आपल्या मित्र-मैत्रिणी व आपेष्टांप्रती प्रेम व्यक्त होत असतानाच न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आई-वडिलांचे पूजन करुन चिमुकल्यांनी त्यांच्याविषयीचे प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.
व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने २५० हून अधिक आई-वडिलांचे पूजन करीत चिमुकल्यांनी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.
चिमुकल्यांनी आपापल्या आई-वडिलांचे पाय धुवून पूजन केले. तसेच औक्षण करुन त्यांचे आशिर्वाद देखील घेतले. इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. भावी पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्व समजावे, याउद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला होता.
