Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

अभिवादन कार्यक्रमातून भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांना शिष्यांनी वाहिली सांगीतिक मानवंदना 

पुणे  : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावरील स्वरचित बंदिशी, पंडितजींनी कन्नड भाषेत गायलेले लोकप्रिय अभंग आणि पंडितजींच्या लोकप्रिय रचना व अभंग यांच्या बहारदार प्रस्तुतीदवारे पंडितजींच्या शिष्यांनी त्यांना सांगीतिक मानवंदना अर्पण केली.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आर्यसंगीत प्रसारक मंडळ व कन्नड संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ अभिवादन ‘ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूल’च्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात पहिल्या सत्रात पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र व गायक पं. श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांचे गायन झाले. पंडित श्रीनिवास जोशी यांनी आपले वडील पं. भीमसेन जोशी यांची संगीत साधना, त्यांचा आवाज, त्यांचा मीतभाषी स्वभाव, अशा विविध पैलूंवर रचलेल्या काही बंदिशी यावेळी सादर करण्यात आल्या. त्यांनी सुरवातीला राग मारवा’मध्ये ‘भगीरथा गानगंगा लाए…’ ही एक तालातील बंदिश सादर केली. त्यानंतर राग दरबारी कानडामध्ये ‘ओंकार ओंकार गुंजत जगत है…’ ही द्रुत झपतालातील बंदिश, वसंत मुखारी रागात ‘अजब निराला उपजा…’ ही रूपक तालातील बंदिश त्यांनी सादर केल्या. राग खमाज’मध्ये ‘सुरसंग रंगरलिया करत है…’ या बंदिशीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना पांडुरंग पवार (तबला) आणि अविनाश दिघे ( हार्मोनियम ) यांनी साथ केली.
दुसऱ्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं उपेंद्र भट यांचे गायन झाले. त्यांनी पंडितजींनी आपल्या गायनाने लोकप्रिय केलेले विविध कन्नड भजन,अभंग, नाट्यगीत, भावगीते यांचे सादरीकरण केले. ‘नंबिदे निन्ना…’ या भावगीताने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. त्यानंतर ‘मुरली ध्वनिया…’, भूप रागातील ‘ तुंगा तिरदी निंता सुयतीवर…’ कर्नाटक रागातील ‘इंदू यनगे श्री गोविंदा …’ ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…,’ अशी विविध भजने त्यांनी सादर केली. ‘करूनिसो रंगा करूनिसो…’ या  जोगिया रागातील प्रस्तुतीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.
त्यांना अभिनय रवंदे (हार्मोनियम), सचिन पावगी (तबला) , गणेश चाकणकर (पखवाज), देवव्रत भातखंडे व अनमोल थत्ते (स्वरसाथ ) माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली.
शेवटच्या सत्रात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचे गायन झाले. त्यांनी ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’ या अभंगाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यानंतर ‘याचसाठी केला होता अट्टहास , शेवट गोड व्हाव’, ‘तीर्थ विठ्ठल’ हा पंडित भीमसेन जोशी यांनी  लोकप्रिय केलेला अभंग सादर केला.
राग भैरवीच्या सादरीकरणाने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.  त्यांना भरत कामत (तबला), राहुल गोळे ( हार्मोनियम) , प्रसाद जोशी (पखवाज)  यांनी साथ केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading