श्री महालक्ष्मी मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सव
पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव होणार असून त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली.
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, अर्चना, पालखी सोहळा व फुलांची होळी तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य खडीमशीन येथील कुष्ठरोगी वसाहतीत वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे.
राजकुमार अग्रवाल म्हणाले, गुरुवार,दिनांक २ फेब्रुवारी रोजी गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना होणार आहे. शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक कार्यक्रम होईल. तर, रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू च्या उत्सवमूर्तींची धान्यतुला होणार आहे. हे धान्य कुष्ठरोगी वसाहतीत देण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता मूर्तीला सोन्याची व चांदीची फुले वाहण्यात येणार आहेत.
शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक होणार असून सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. फुलांनी सजविलेल्या पालखी रथातून उत्सवमूर्तींची मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी पारंपरिक वेशात भाविक सहभागी होणार आहेत. तसेच रात्री ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
