fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

प्रतिभा सिंग बघेल आणि पृथ्वी गंधर्व यांच्या गझल गायनाने वसंतोत्सवच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप

पुणे : प्रतिभा सिंग बघेल आणि पृथ्वी गंधर्व या तरुण पिढीतील गायकांच्या बहारदार गझलगायनाने आज वसंतोत्सवच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला.

यावर्षी पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात आलेला १६ वा ‘वसंतोत्सव’ म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी संपन्न होत आहे.

महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाची सांगता गझल गायनाने झाली. सुरुवातीला सुप्रसिद्ध गायिका प्रतिभा सिंग बघेल यांनी तर त्यानंतर पृथ्वी गंधर्व यांनी एकल सादरीकरण केले. यानंतर या दोघांनी एकत्रित सादरीकरण करीत उपस्थितांची वाह वाह मिळविली.

आज वसंतोत्सवमध्ये सादरीकरण करणे हे माझ्यासाठी भाग्य आहे असे सांगत प्रतिभा म्हणाल्या , “पं वसंतराव देशपांडे यांच्या स्मृती आजही पुण्यात तुमच्यासारख्या रसिकांच्या रूपाने कायम आहेत. आज त्यांच्या याच अस्तित्वाला प्रणाम करून मी गझल प्रस्तुती करीत आहे.” नासीर काझमी यांची गुलाम अली यांनी संगीतबद्ध केलेली व आशा भोसले यांनी गायलेली ‘दिल धडकने सबब याद आया…’ या गझलने प्रतिभा यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी जिगर मुरादाबादी यांची ‘आखोंका ना था कसूर, दिल का कुसूर था…’ ही, आशा भोसले यांनी गायलेली ‘ दिल चीज क्या है…’ ही गझल प्रस्तुत केली. शोभा गुर्टू यांनी गायलेली ‘उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या उघड्या…’ या मराठी गझल गायनाने आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

मी पहिल्यांदाच पुण्यात सार्वजनिक कार्यक्रम करीत आहे. आज वसंतराव देशपांडे यांच्या नावाने देशातील एक महत्त्वपूर्ण संगीत महोत्सव पुण्यात होत आहे, यामध्ये सहभागी होणे हे माझे भाग्य आहे असे सांगत पृथ्वी म्हणाले, “महोत्सवाच्या सातत्यपूर्ण आयोजनासाठी राहुल देशपांडे यांचे कौतुक आहे. सर्वानाच वसंतराव देशपांडे यांसारखे आजोबा आणि राहुल यांसारखे नातू मिळावेत.”

‘शोला था जल-बुझा हूँ हवाएँ मुझे न दो…’ या गझलने पृथ्वी यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. यांनतर त्यांनी ‘बन नहीं पाया वो मेरा हमसफर…’, ‘. गुलों में रंग भरे बाद-ए-नौ-बहार चले…’, ‘नीयत-ए-शौक़ भर न जाये कहीं तू भी दिल से उतर न जाये कहीं…’ या गझल सादर केल्या.

कार्यक्रमाच्या समारोपाला प्रतिभा सिंह बघेल आणि पृथ्वी गंधर्व यांनी एकत्रित सादरीकरण केले. यावेळी त्यांनी अहमद फराज साहेबांची ‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ…’ ही गझल प्रस्तुत केली. या दोघांनाही प्रशांत सोनाग्रा (तबला), गौरव वासवानी (की बोर्ड), आखलाख वारसी (संवादिनी), निनाद मुळावकर (बासरी), सुशांत सिंग (गिटार), रोहित (पर्कशन्स) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading