Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे समृद्ध अन्नसाखळीचा भारतीयांना विसर

  • बबलू गांगुली, प्रमुख, टिंबकटू कलेक्टीव्ह फौंडेशन, आंध्र प्रदेश 

पुणे : पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय आहार हा सगळ्यात पोषक आहार म्हणून गणला जात होता. भारतीय भरडधान्य आणि तृणधान्य याविषषयी आपल्या मनात न्यूनगंड तयार करून प्रक्रीयायुक्त अन्न आपल्यामाथी मारण्यात येत आहे. आपल्या पुढील पिढीच्या संरक्षणासाठी भारतीय आहाराची आणि समृद्ध अन्नसाखळीची परंपरा पुन्हा एकदा पुनरूज्जीवीत करावी लागेल, असे मत गेल्या 40 वर्षांपासून अन्नसुरक्षा या विषयात कार्यरत असलेल्या आंध्र प्रदेश येथील टिंबकटू कलेक्टीव्ह फौंडेशनचे प्रमुख बबलू गांगुली यांनी व्यक्त केले.

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबतर्फे आयोजित १६ व्या ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (KVIFF) पत्रकार संघ येथे आज आयोजित विशेष वार्तालाप कार्यक्रमात गांगुली बोलत होते.
यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे आणि महोत्सव संयोजक विरेंद्र चित्राव उपस्थित होते.

यावेळी बोलताना बबलू गांगुली म्हणाले की, परंपरेने अन्नसाखळीचे ज्ञान हस्तांतरीत होत होते. मात्र, आता ती प्रक्रीया खंडीत झाली असून आपले पारंपारिक ज्ञान हे जुनाट ठरवले जात आहे. वास्तविक पाहता केवळ पोटभरण नव्हे, तर पोषण हे आपल्या भारतीय अन्नसाखळीचे महत्त्वाचे सूत्र होते. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आपल्या या समृद्ध अन्नसाखळीचे महत्त्व आपण टिकवून ठेवू शकलो नाही. तीनशे ते पाचशे वर्गवारीत पूर्वी आंब्याच्या जाती उपलब्ध असताना आता ती संख्या केवळ पाच ते सहा वर्गवारीपर्यंत येऊन ठेपली आहे. प्रक्रियायुक्त अन्न हे अन्न नसून विष आहे आणि आपण त्याचे बळी ठरत आहोत. कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात उपलब्ध तृृणधान्य आणि भरडधान्याची आता जागतिक पातळीवर चर्चा होऊ लागली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि रेडी टू कूकच्या जमान्यात आपली भरडधान्य आणि तृणधान्य यांना काही मर्यादा पडत असल्या तरी त्यावर उपाय शोधणे ही, काळाची गरज आहे. केवळ पोषाणमूल्यांशी समझोता करून आपण अन्न म्हणून जे खात आहोत, तेच खात राहिलो, तर आपली पुढील पिढी सशक्त निर्माण होणार नाही. प्रक्रीयायुक्त अन्नपदार्थांमध्ये पोषणमूल्यांचे शोषण केले जाते आणि केवळ चवीवर लक्ष केंद्रीत केले जाते. भरडधान्य आणि तृणधान्याचे उत्पादन आणि विपणन याची सांगड घालणे आवश्यक आहे.

यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे आणि महोत्सव संयोजक विरेंद्र चित्राव यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading