Shirdi : खासगी बस – ट्रक भीषण अपघातात 10 भाविकांचा मृत्यू
नाशिक : शिर्डी- सिन्नर महामार्गावरील पाथरे शिवाराजवळ आज (१३ जानेवारी) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बस मधील 26 जखमी प्रवाश्यांवर सिन्नर मधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिकला येणाऱ्या खाजगी बस नाशिकहून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकची समोरासमोर धडक झाली. यावेळी पाथरे ते पिंपळवाडी टोलानाक्यावर एकेरी वाहतूक सुरु होती.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. यातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून बसची एका बाजूने पूर्णपणे तुटली आहे. या अपघातग्रस्त बसमधून ठाणे परिसरातील जवळपास 50 प्रवासी शिर्डीला जात होते. उल्हासनगरहून शिर्डीतील साई बाबांच्या दर्शनासाठी 15 बसेस निघाल्या होत्या, या बसेसमधील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे निर्देश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च पूर्णपणे शासन उचलणार आहे.
