सियाचिन, आसामच्या सिमेवरील सैनिकांना तिळगूळाचा गोडवा
पुणे : भारत मातेच्या जयजयकारात आणि सैनिकांच्या वीरतेला सलाम करीत विद्यार्थ्यांनी आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांना मकर संक्रांतिनिमित्त पाठविण्यात येणाऱ्या तिळगुळाचे पूजन केले. कच्छचे रण, सियाचिन, आसामच्या दुर्गम भागातील सीमेवरील सैनिक, जम्मू, लेह मध्ये प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांपर्यंत हा तिळगूळाचा गोडवा पुणेकरांच्या वतीने पोहचविण्यात येणार आहे.
सैनिक मित्रपरिवार, शनिवार पेठ मेहूणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पा बळवंत चौकातील नूमवि प्राथमिक शाळेच्या सभागृहात तिळगूळ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९ मराठा लाईट इन्फ्टंट्रीचे निवृत्त मेजर बजरंग निंबाळकर, निवृत्त मेजर आशा शिंदे , सामाजिक कार्यकर्त्या वीणा गोखले, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, मेहूणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रत्नाकर दिवाकर, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या सोनावणे, कुणाल पवार, उमेश सकपाळ, कौस्तुभ गोखले,संतोष कोलामडे, नकुल दिवेकर यावेळी उपस्थित होते. ३०० किलो तिळगूळाचे पूजन यावेळी करण्यात आले. उपक्रमाचे यंदा २५ वे वर्ष आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, आणि गृहरचना संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
बजरंग निंबाळकर म्हणाले, देशासाठी लढणाऱ्या सैनिकाला, आपल्या मागे आपल्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत ही भावना सुखावणारी असते. केवळ सैनिक शत्रूंसोबत युद्ध करण्यासाठी पुरेसा नसतो देशांतर्गत शक्ती देखील त्यासाठी गरजेची आहे.
आशा शिंदे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य कमी होत चालले आहे. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सैनिक घडले पाहिजे. एनडीए जवळ आहे तरीही महाराष्ट्रातून सैन्यात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. प्रत्येक घरातून एक सैनिक निर्माण व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, सन १९९७ पासून सैनिकांसाठी तिळगुळ पाठविण्याचा हा उपक्रम सुरू आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशवासीयांच्या वतीने सैनिकांना तिळगुळ पाठविण्यात येतो. आपल्या कुटुंबापासून दूर असणारे सैनिक ही सुद्धा माणसेच आहेत याची जाणीव ठेवण्यासाठी तिळगुळ पूजनाचा कार्यक्रम घेतला जातो. शितल शेलार यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. पराग ठाकूर यांनी आभार मानले.
