Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास

पुणे : मटार, पालक, गाजर, मुळा, टोमॅटो, लसूण, बटाटे, कणीस यांसारख्या भाज्यांसह द्राक्ष, डाळींब, संत्रे, खरबूज, कलिंगड आणि सफरचंदासारख्या अनेक फळांची आकर्षक आरास लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली होती. विविध प्रकारच्या भाज्यांनी सजलेले मंदिरातील खांब, विविधरंगी फळांचे तोरण आणि कळसापासून पायथ्यापर्यंत लावलेला ऊस असे मनोहारी दृश्य भाविकांना पहायला मिळाले. फळ, भाज्यांवर कोरलेल्या नक्षीदार मूर्ती मोबाईल कॅमे-यामध्ये टिपण्याचा मोह देखील यावेळी अनेकांना झाला.

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दत्तमंदिरामध्ये ३५ प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करुन आरास साकारण्यात आली. श्री म्हसोबा देवस्थान खारावडेच्या अध्यक्षा मधुरा व मुकुंद भेलके यांच्या हस्ते सजावटीचे अनावरण झाले.

श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थानचे विश्वस्त रवींद्र शेडगे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपव्यवस्थापक (प्रशासन) समीर व गीता रजपूत यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला.

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता. तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरीता ॠषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला, सगळीकडे सुखसमृद्धी नांदू लागली. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी आरास करण्यात आली.

मंदिराच्या मुख्य गाभा-यासह कळसापासून पायथ्यापर्यंत ही आरास करण्यात आली आहे. फळ-भाज्यांमध्ये नक्षीकामाने साकारलेल्या विविध मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच भाज्यांची आगळी-वेगळी रांगोळी पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. ही सजावट शनिवार, दिनांक ७ जानेवारीपर्यंत भाविकांना पाहण्यास खुली राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading