fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पुन्हा भरली सावित्रीबाईंची शाळा… 

पुणे : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना शिक्षित करण्याचा निर्धार त्यांनी केला…आणि असंख्य हाल अपेष्टा सहन करीत आपला निर्धार सुरूच ठेवला… त्यांच्या एका विचारामुळे आज सावित्रीबाई फुले ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असा यशस्वी पल्ला भारताच्या महिलांनी गाठला. असे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भिडे वाड्याला मानवंदना देण्यात आली. त्यांच्या कार्याचे जागरण करण्यासाठी भिडे वाड्याशेजारी पुन्हा एकदा सावित्रीबाईंची शाळा भरली.
इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने भिडे वाड्यामध्ये मुलींच्या शाळा सुरू होण्याच्या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त भिडे वाड्यास वास्तू मानवंदना देण्यात आली. यावेळी कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, शिक्षिका मनीषा पाठक यावेळी उपस्थित होत्या.
दिव्या सौरभ जगताप हिने सावित्रीबाई फुले यांची तर अभिषेक शाळू यांनी महात्मा फुले यांची भूमिका केली. सुंदराबाई राठी प्रशाला आणि सेवा सदन संस्थेच्या रमाबाई रानडे प्रौढ प्रशालेतील विद्यार्थिनींनी फुले दांपत्याबद्दल आदर व्यक्त केला.
मृणालिनी कानिटकर जोशी म्हणाल्या, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी ज्ञानज्योत लावली आणि स्त्रियांचे आयुष्य उजळून निघाले. समाजाने त्यांचे ऋणी असायला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण अज्ञानाच्या अंधारातून बाहेर आलो. त्यामुळे स्त्रियांनी शिक्षण घेऊन घरी बसू नका आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काम करा, असेही त्यांनी सांगितले.
मोहन शेटे म्हणाले, १ जानेवारी १८४८ पासून भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली या घटनेला यावर्षी १७५ वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त स्त्री शिक्षणाची गंगोत्री असणाऱ्या भिडे वाड्यास मानवंदना देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading