‘अशोक पर्व’ मधून उलगडणार अभिनेते अशोक सराफ यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्णमहोत्सवी प्रवास
पुणे : सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य – चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत त्यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी प्रवास उलगडणाऱ्या ‘अशोक पर्व’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रावेतकर ग्रुप तर्फे येत्या ४, ७ व ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनात राजेश दामले यांच्या अभिव्यक्ती या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. प्रत्येक दिवशीच्या कार्यक्रमास स्वतंत्र प्रवेशिका आहेत याची कृपया रसिकांनी नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिका प्रत्येक कार्यक्रमाच्या ३ दिवस आधी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उपलब्ध असतील.
‘अशोक पर्व’ या विशेष कार्यक्रमात अशोक सराफ यांची लोकप्रिय गाणी, त्यांची भूमिका असलेले नाटक व चित्रपट तसेच सराफ यांची प्रकट मुलाखत रसिकांना अनुभविता येणार असल्याची माहिती रावेतकर ग्रुपचे संचालक अमोल रावेतकर यांनी कळविली आहे.
‘अशोक पर्व’चे उद्घाटन बुधवार, दि. ४ जानेवारी रोजी रात्री ८:४५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर लगेचच अशोक सराफ व अभिनेत्री निर्मिती सावंत यांची भूमिका असलेल्या ‘व्हॅक्यूम क्लिनर’ या नाटकाचा प्रयोग होईल.
त्यानंतर शनिवार, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १०: ३० वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री रंजना, जयराम कुलकर्णी, निळू फुले, पद्मा चव्हाण, सुलोचना लाटकर यांची भूमिका असलेल्या ‘सासू वरचढ जावई ‘ या चित्रपटाचे स्क्रिनिंग होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ‘हृदयी वसंत फुलताना’ ही अशोक सराफ यांच्यावर चित्रित लोकप्रिय गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार असून, अभिनेते चिन्मय मांडलेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.
रविवार, दि. ८ जानेवारी रोजी अभिनेते प्रशांत दामले हे अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतील. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. कार्यक्रमानंतर रसिकांच्यावतीने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असतील.