fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन १ जानेवारीपासून तर घोड कालव्याचे १० जानेवारीपासून

पुणे : कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. कुकडी डाव्या कालव्याचे रब्बीमधील आवर्तन १ जानेवारी २०२३ रोजी तर घोड डावा व उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन १० जानेवारी २०२३ रोजी सोडण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार सर्वश्री दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोषकुमार सांगळे आदी उपस्थित होते.

डिंभे बोगद्याच्या कामासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार तातडीने या कामाचा प्रस्ताव करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि श्री. विखे- पाटील यांनी दिले. धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे म्हणून गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, सूचना यावेळी मंत्रीमहोदयांनी दिल्या.

डिंभे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी बिगरसिंचनामधून ३० कोटी खर्चून काम करण्यात आले आहे. यावर्षी अजून ३० कोटी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.

रब्बीत कुकडी डाव्या कालव्याचे एक तर घोड कालव्यातून दोन आवर्तने
कुकडी डावा कालव्याचे सुरू असलेल्या रब्बी हंगामात एक आवर्तन आणि उन्हाळी एक आवर्तन देण्यात येणार असून पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी हंगामांच्या दुसऱ्या आवर्तनाबाबत बैठक घेण्याचेही यावेळी ठरले. माणिकडोह धरणातून येडगाव धरणासाठी कुकडी नदीद्वारे, पिंपळगाव जोगे डावा कालवा, डिंभे उजवा कालवा, डिंभे डावा कालवा, घोड शाखा कालवा, मीना शाखा कालवा, मीना पूरक कालवाद्वारे पाणी सोडण्याचे नियोजनही यावेळी निश्चित करण्यात आले. घोड डावा व उजव्या कालव्याची रब्बीची दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित करण्यात आले. रब्बी हंगामानंतर पाणीसाठा उन्हाळी आवर्तनाबाबत बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.

बैठकीस कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, स्वप्नील काळे, एस. जे. माने, एम. एम. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading