fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

आंतरविद्याशाखीय शिक्षणपद्धतीचा मुहूर्तमेढ रोवणारे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संधी

पुणे: नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधीच आंतरविद्याशाखीय शिक्षणाच्या मुल्यावर आधारीत अभ्यासक्रम राबविणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील विद्यापीठ ठरले आहे. आजमितीस जवळपास अडीचशे विद्यार्थ्यानी अशी आंतरविद्याशाखीय पदवी प्राप्त केली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सामंजस्य करार करीत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

याबाबत माहिती देताना आंतरविद्याशाखीय विज्ञान प्रशालेचे विभागप्रमुख डॉ.अविनाश कुंभार म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील या विज्ञान प्रशालेची (आयडीएसएस) स्थापना २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात झाली. आंतरविद्याशाखीय प्रशालेत कोणत्याही विद्याशाखेतील कोणताही विषय घेत विद्यार्थी त्यांची पदवी पूर्ण करू शकतात. या प्रशालेच्या माध्यमातून पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि भूशास्त्र या विषयांमध्ये ‘बीएससी ब्लेंडेड’ हा व्दिलक्षी अभ्यासक्रम करता येतो. तर ‘बीए लिबरल आर्ट्स’ या पदवीच्या माध्यमातून मानसशास्त्र, अर्थशास्त्र यापासून ते माध्यम शिक्षणापर्यंत मेकिंगपासून अनेक विषय घेत पदवी घेण्याची संधी आहे. याखेरीज जे विद्यार्थी पारंपरिक पदवी घेत आहेत त्यांनाही या प्रशालेच्या माध्यमातून विषय निवडत पदवी घेण्याची संधी उपलब्ध आहे.

डॉ.कुंभार म्हणाले, प्रशाले अंतर्गत मागील तीन वर्षात सहा सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यातील मेलबर्न सोबतच्या करारात आपण ‘ युनि्हर्सिटी ऑफ मेलबर्न आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ॲकडमी’ विद्यापीठात स्थापन केली आहे. यामुळे विद्यापीठासोबतच संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम घेता येईल व विविध उपक्रमात सहभागी होता येईल.

काहीच दिवसांपूर्वी विद्यापीठातील १७ जणांचा गट मेलबर्न विद्यापीठात आयोजित परिषदेत सहभागी झाला होता, ज्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा समावेश होता. या कराराच्या माध्यमातून अत्यंत महाग असणारे शिक्षण परवडणाऱ्या दरात देणे, विज्ञान आणि अन्य विषयातील संधींचा विस्तार करणे,परदेशी शिक्षणाच्या संधी देणे हा आमचा प्रयत्न आहे.

यासोबतच प्रशालेने ‘ सॉइल टेक कंपनी’ शी सामंजस्य करार केला आहे. त्या माध्यमातून मोठे रस्ते, बोगदे, पुल अशा महत्वाच्या प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यामध्ये सहा विद्यार्थी हे सखोल संशोधन करत आहेत.

प्रशालेने पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाशी करार केला आहे, ज्यातून गुन्हेगारांची रेखाचित्र हा अभ्यासक्रम सुरू आहे, संचेती हेल्थकेअर, जेम्स अँड ज्वेलरी, मुंबई यांच्यासोबत करार करत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान भविष्यात हा विभाग आणखी विस्तरणार असून नवीन शैक्षणिक धोरणात सांगितल्या प्रमाणे व कुलगुरू डॉ.कारभारी काळे आणि प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग आणखी नवे उपक्रम, नव्या संधी निर्माण करेल यात शंका नाही असेही डॉ कुंभार यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading