fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पाण्याच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे – डॉ. सुहास वाणी

पुणे – पाणी मर्यादित संसाधन असल्यामुळे ते कमी जास्त होत नाही. जलचक्र कायमस्वरूपी एकच आहे. पाण्याची गरज कशी पूर्ण होईल याकडेच प्रत्येकाचे लक्ष आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये पाण्याची दरडोई उपलब्धता जास्त आहे. भारतात देशाच्या एकूण क्षेत्रफळावर सरासरी ११७० मि.मी. एवढा पाऊस पडतो. पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन काटेकोरपणे होत नसल्याने आपल्याकडे सातत्याने दुष्काळजन्य आणि तीव्र टंचाईची परिस्थिती उद्भवत असते. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ संशोधक आणि द इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी- एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट)चे माजी संचालक डॉ. सुहास वाणी यांनी व्यक्त केले.

“शाश्वत भूजल” या विषयावरील वनराई वार्षिक विशेषांक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन झाले तर जेष्ठ संशोधक आणि द इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी- एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट)चे माजी संचालक डॉ. सुहास वाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. जलसंवाद मासिकाचे संपादक डॉ. दत्ता देशकर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश खाडे यांनी केले तर आभार मंगेश काळे यांनी मानले.

डॉ. वाणी म्हणाले, पाणी उपाययोजना संदर्भात आपण वृक्ष झालो आहोत. मांसाहाराच्या तुलनेत फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवण्यासाठी कमी पाणी लागते. सगळ्यांनी शाकाहारी झाल्यास पाण्याची गरज भासणार नाही. ज्या पाण्यावर कोणाची तरी तहान भागवली जाऊ शकते असे हजारो लीटर पाणी शॉवर, बाथटब, टॉयलेट फ्लश, वॉश बेसिन इत्यादीद्वारे दररोज घराघरांतून वाया घालवले जाते. म्हणूनच केवळ धरणे बांधून आणि ग्रामीण भागात जलसंधारण करून ‘जलसुरक्षा’ साधता येणार नाही, तर शहरांमध्येसुद्धा पाण्याच्या वापरबाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

चिंतामणी जोशी म्हणाले, भूजल ही नैसर्गिक आणि राष्ट्रीय संपत्ती असून, भूजलावर प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे. जागतिक भूगर्भातील पाणीसाठ्यापैकी २४ टक्के पाण्याचा उपसा आपण पाण्याची गरज भागवण्यासाठी करत आहोत. भूजल उपशाच्या बरोबरीने जलसंधारणासाठी किंबहुना भूजल पुनर्भरणासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. मृदा-जलसंधारणाच्या कामांतून गावांत जलसाठे निर्माण झाले आणि भूजल पातळीत वाढ झाली म्हणजे गावकऱ्यांची सामुदायिक जबाबदारी संपली, असे मानून चालत नाही. तर उपलब्ध पाण्याचा मुख्यत्वे भूजलाचा काटकसरीने आणि समन्यायी वापर होण्यासाठीही व्यक्तिगत आणि सामुदायिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

रवींद्र धारिया म्हणाले की, पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण करणे आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या अखेरीस ओढ्या नाल्यातून वाहून जाणारे पाणी श्रमदानातून ठिकठिकाणी अडवण्या-मुरवण्यासाठी “वनराई बंधारा” हे बांधण्यात आले. यातूनच गावागावांमध्ये मृदा, जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहिली आणि शेकडो गावे जलसमृद्ध झाली. जलसंधारणाबरोबरच जलसाक्षरतेसाठी ‘वनराई’ संस्था गेली ३६ वर्षे धोरणात्मक पातळीवर आणि तळागाळामध्ये आपले योगदान देत आहे. शिवाय लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठीही विशेष प्रयत्न करत आहे. या विशेषांकाची निर्मिती देखील त्याचाच एक भाग आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading