fbpx

जात पात बाजूला ठेवा, महापुरुष सर्वांचेच – डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे मत

पुणे:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री, पुरुष, कामगार, शेतकरी या सर्वांसाठी लढा दिला, त्यांचे प्रश्न मांडले. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही त्यामुळेच आपणही या महापुरुषांना कोणत्याही जातीपातीमध्ये, कोणत्याही वर्गात न विभागता त्यांचे विचार आचरणात आणावे असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस व लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने ‘ अनंत पैलुंचा सामाजिक योद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘ या विषयावर डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासानचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव उपस्थित होते.

डॉ. लुलेकर म्हणाले, स्त्री पुरुष दोघांनाही समान वेतन मिळायला हवे, स्त्रियांना गरोदरपणात पगारी रजा हवी, आदिवासी समाजाला त्यांच्या हक्काची जमीन मिळायला हवी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांनी अनेक घडलेल्या घटनांचे दाखले दिले. त्यासोबतच जलधोरण, वीजधोरण, शेती धोरण ठरविण्यात ते कायमच आघाडीवर होते असेही डॉ. लुलेकर यावेळी म्हणाले.

बाबासाहेबांना अनेक कोनातून पाहण्याची आणि त्यांना जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळाली असे मत डॉ.संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, घटना लिहीत असताना देश खेड्यांनी बनला आहे त्यामुळे खेडे हे या घटनेच्या मुळाशी असावे असा युक्तिवाद असताना प्रत्येक व्यक्ती ही घटनेचा पाया असावी असा युक्तिवाद डॉ.आंबेडकर यांनी केला असल्याची आठवणही यावेळी ड.सोनवणे यांनी सांगितली.

डॉ.मनोहर जाधव म्हणाले, बाबासाहेबांचे सर्वसमावेशक विचार हे नव्या पिढीसमोर यायला हवेत. वैचारिक जळमटे दूर करणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: