fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

आपच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या

आणखी ३८ महिला भारतात परतण्याच्या वाटेवर 

पुणे : आम आदमी पार्टीच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या पुणेकर पुजा कसबे यांच्यासह ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच अजून ३८ घरकामगार महिलांची भारतात येण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आखाती देशात जाणाऱ्या घर कामगार महिलांची फसवणूक रोखण्यासाठी आम आदमी पार्टी विशेष प्रयत्न करणार असल्याचे देखील विजय कुंभार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला विजय कुंभार यांच्यासोबत आपचे डॉ अभिजीत मोरे, अब्बास खान , निरंजन अडागळे, पूजा कसबे, श्रद्धा गायकवाड यांनी संबोधित केले.

भारतातील एजंटच्या भूलथापांना बळी पडत पुण्यातील पूजा नितीन कसबे या मोठ्या पगाराच्या प्रलोभनाने (महिना ४० हजार रुपये वेतन) ओमान देशात घरकाम करण्यासाठी जुलै २०२२ मध्ये गेल्या. मात्र तिथे गेल्यावर त्यांना त्यांची एजंटने फसवणूक केल्याचे लक्षात आले. महिना ४० हजार रुपयांऐवजी केवळ १०० रियाल म्हणजे सुमारे २०-२१ हजार रुपये प्रति महिना एवढेच वेतन कराराद्वारे ठरल्याची बाब तिथल्या मालकांनी पूजा कसबे यांना सांगितले. या वीस हजार रुपयांच्या बदल्यामध्ये त्यांना कोणतीही विश्रांती अथवा सुट्टीशिवाय दररोज पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत काम करण्यासाठी दबाव टाकला गेला. त्यांचा पासपोर्ट मालकाने जप्त केला. मोठ्या मुश्किलीने ऑगस्ट महिन्यात त्या तेथील मालकाच्या बंगल्यातून पळून भारतीय दूतावासाच्या मस्कत शहरातील एका शेल्टरमध्ये पोहचल्या. या शेल्टरमध्ये त्या तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ अडकून पडल्या होत्या. या शेल्टरमध्ये सुमारे ८० फसवणूक झालेल्या घरकामगार महिला अडकून पडल्या होत्या. त्यातील काही महिला तर एक- दीड वर्षाहून जास्त काळ अडकल्या होत्या.

ओमान मधील ज्यांच्या बंगल्यामध्ये पूजा कसबे काम करत होत्या ती तेथील एक प्रभावशाली व्यक्ती होती आणि भारतातून घर कामगार महिला ओमानमध्ये आणण्यासाठी त्यांनी खर्च केलेले १००० रियाल म्हणजे सुमारे २,००,००० रुपये ते २,२५,००० रुपये परत केल्यानंतरच त्यांना भारतात जाता येऊ शकेल असे त्यांनी सांगितल्याने पूजा कसबे यांची मोठी पंचाईत झाली होती. पूजा कसबे यांच्या वहिनी श्रद्धा गायकवाड यांनी आम आदमी पक्षाच्या निरंजन आडागळे व डॉ अभिजीत मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विजय कुंभार यांच्याशी याबाबत चर्चा केली. विजय कुंभार यांनी अब्बास खान यांच्या मदतीने ओमान मधील काही प्रभावशाली भारतीय उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी ओमान मधील पूजा कसबे यांना नोकरी देणाऱ्या मालकाशी प्रत्यक्ष चर्चा केली. या उद्योजकांनी ओमान देशातील स्थानिक राजकीय नेते, अधिकारी यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. परिणामी फलस्वरूप म्हणून केवळ पूजा कसबेच नव्हे तर भारतीय दुतावासाच्या मस्कत येथील शेल्टरमध्ये अडकून पडलेल्या ८० पैकी तब्बल ४२ घरेलू कामगार महिला या महिन्यामध्ये भारतात परतल्या आहेत. अजून ३८ घरेलू कामगार महिलांना भारतामध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सोमवारी पूजा कसबे या पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या नाना पेठ येथील कार्यालयाला कुटुंबीयांसहित भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading