जिल्हा विधि सेवा प्राधिकरणामार्फत विविध उपक्रमांच्या आयोजनाने संविधान दिन साजरा
पुणे : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यात ‘संविधान सप्ताह’ साजरा करण्यात येत असून २६ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने संविधान दिन साजरा करण्यात आला, अशी माहिती प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल दी. कश्यप यांनी दिली.
संपूर्ण राज्यामध्ये कायदेशीर सेवांच्या प्रत्येक स्तरावर गाव, तालुका ते राज्यस्तरापर्यंत ‘संविधान सप्ताह’ साजरा करण्याचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पुणे बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर येथे ‘संविधान दिनानिमित्त’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्याम छ. चांडक, जिल्हा न्यायाधीश – १के. पी. नांदेडकर, जिल्हा न्यायाधीश- २ एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश- ३ ए. एस वाघमारे, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी अभियोक्ता एन. डी पाटील, पुणे जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे, न्यायालयीन कर्मचारी, अभियोक्ता व विधी स्वयंसेवक आदींनी सहभाग घेतला. या रॅलीद्वारे संविधानाच्या कलम २१, ३९-अ व ५१-अ अंतर्गत नागरिकांचे अधिकार व मुलभूत कर्तव्याबद्दल जनजागृती करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे कैद्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये संविधानाच्या कलम २१, ३९-अ व ५१-अ अंतर्गत ‘नागरिकांचे अधिकार व मुलभूत कर्तव्ये’ याबद्दल ६ हजार ५५५ कैद्यानां मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय याच महाविद्यालयाच्या सहकार्याने ऑनलाईन ‘पोस्टर मेकिंग स्पर्धा’ व ‘प्रश्न मंजुषा स्पर्धा’ आयोजित करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लायन्स क्लब ऑफ पुणे विधीज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने दृकश्राव्य प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेच्या विविध २७० शाळांमध्ये ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन, चित्रकला स्पर्धा प्रदर्शन तसेच संविधानाच्या कलमांतर्गत विद्यार्थ्यांचे हक्क यावर मार्गदर्शन करण्यात आले. अॅड. रूपादेवी राजेशिर्के, लायन्स अॅड. राजेंद्र अनभुले, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल श्री. सुनील चेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास निवृत्त न्यायाधिश, प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, मनपा तसेच विधी सेवा प्राधिरणाचे विधी स्वयंसेवक, पॅनल अॅडव्होकेट, लायन्स क्लबचे इतर सदस्य व तसेच ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते, अशीही माहिती कश्यप यांनी दिली आहे.
