भिडे वाड्या च्या दुरावस्थे संदर्भात त्या दोघांनीही बैठक नाही घेतली तर आंदोलन -छगन भुजबळ
पुणे: महात्मा फुलेंनी जिथं शिक्षणाचं मोठं कार्य उभारलं त्या भिडेवाड्याची आजची अवस्था वाईट आहे. मी आजदेखील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची बैठक घ्यायला सांगितलं आहे. त्या दोघांनीही लवकरच पुण्यात यासंदर्भात बैठक घेऊ .असं सांगितले आहे. थोडे दिवस वाट बघू, अन्यथा आंदोलन अटळ आहे. असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणालेत.
पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा २०२२’ पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
निफाडमध्ये एका शाळेच्या कार्यक्रमाला गेलो तिथे समोर सरस्वतीचा फोटो, त्याची पूजा मग मी नाही करत सांगितले. शिक्षकच असे असतील तर विद्यार्थ्यांचे काय? दिनदलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमेव प्रभावी अस्त्र-शस्त्र आहे. बाकी अंधश्रद्धा आहे त्या जातच नाही. ओह माय गॉड सिनेमा मी पाहिला होता. त्याच्या दुकानाला आग लागली तेव्हा देवानं नुकसान भरून द्यावं असे त्याने सांगितले. देव आम्हाला सगळं देतो मग आग पण त्यानेच लावली त्याने द्यावं ना असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत आपण ब्राह्मणाच्या विरोधात नाही. ब्राह्मणवादाविरोधात फुले होते. ब्राह्मणांविरोधात नव्हते. कारण अनेक ब्राह्मणांनी त्याकाळी मदत केली होती. आज महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी केली जातेय. महिलांविषयी सार्वजनिक ठिकाणी रामदेवबाबा अशी विधाने करतात. हे बोलण्याचं धाडस कुठून येते? आमच्या महापुरुषांना नावं ठेवायची असं सांगत भुजबळ यांनी रामदेव बाबांच्या विधानाचा समाचार घेतला.
तसेच ६ डिसेंबरला मुंबईला यायला सांगावं लागत नाही. १०-१५ लाख लोक उन्हातान्हात उभे राहतात. रायगडावर जायला कुणाला सांगावं लागत नाही. लाखो जण तिथे जातात. पण महात्मा फुलेंबाबत असं काही घडत नाही. लोकांचा रेटा लावावा लागतो. लाखो अनुयायी आहेत पण पुढे कोण येत नाही. आमच्या भगिनींना सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण मिळालं. पहिल्या शाळेत ६ मुली होत्या. त्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष गायला २५-५० हजार महिला सामुहिक वाचन करायला येतात. पण सावित्रीबाईंनी जिथं पहिली शाळा उभारली तिथे जाऊन क्षणभर मस्तक ठेवावं असं कुणालाही वाटत नाही. दोऱ्यावाली सावित्री नवऱ्याला विचारत नाही ७ जन्म राहणार की नाही. न विचारताच बांधत असतात अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण लावतो. आंबेडकरांच्या लावतो पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावताना अडचणी येतात.पुणे विद्यापीठाला नाव देताना देखील अशाच अनेक अडचणी आल्या होत्या. पण भिडेवाड्याच्या कार्याबाबत मी स्वत:पाठपुरावा करेन, असं भुजबळ म्हणालेत.
