fbpx

‘बालभारती ‘च्या कलाकारांचा ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील मुलांशी संवाद

पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी प्रशाला विद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘बालभारती’ चित्रपटातील कलाकारांनी शुक्रवारी मनमुराद संवाद साधला. यावेळी बोलताना चित्रपटाचा हिरो सिद्धार्थ जाधव म्हणाला की, मुलांनी शाळेत आयुष्य मनमुराद जगले पाहिजे आणि आपल्याला जे आवडते ती गोष्ट पूर्ण शक्तिनिशी केली पाहिजे.
सिद्धार्थ आणि त्याचे सहकलाकार तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चमूने मुलांबरोबर खुप गप्पा मारल्या. यावेळी एका विद्यार्थीनीने सिद्धार्थला प्रश्न विचारला की तिला मोठी होवून अभिनेत्री बनायचे आहे तर काय करावे लागेल. त्यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, “तुमच्या आवडीची जी गोष्ट आणि छंद असेल तो तुम्ही मनमुराद जपा. तसे केल्यास आणि त्यात संपूर्ण लक्ष झोकून दिल्यास तुम्हाला यश आपोआपच मिळेल. आपल्या आवडीची गोष्ट करण्यासारखे दुसरे सुख नाही.”
यावेळी चित्रपटाची नायिका नंदिता पाटकर हिलाही मुलांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना ती म्हणाली, “बालभारती मधील आई ही तुमच्या आमच्या घरातील आई आहे. आपल्या प्रत्येकाची आई ही आपल्या मुलाला सर्वोत्तम ते देण्यासाठी धडपडत असते. ‘ बालभारती ‘ मधील चीम्याची आईसुद्धा तशीच आहे. तिची मते ठाम आहेत आणि ते मुलासाठी काहीही करायला तयार असते. त्यामुळे या चित्रपटाची कथा तुम्हाला तुमची गोष्ट वाटेल.”
चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन नंदन यांनी आपण या चित्रपटासाठी खूप संशोधन केल्याचे सांगितले. “ही कथा ही प्रत्येक घरातील गोष्ट आहे. त्यासाठी मी अनेक शाळांमध्ये फिरलो आणि बऱ्याच मुलांशी बोललो. शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. त्यातून मला ही संकल्पना अधिकाधिक उलगडता आली. ती मांडत असताना ती रंजक पद्धतीने मांडली आहे.”
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन सखोल वाचन करावे व लेखन करून आपला शिक्षणाबाबतचा दर्जा उंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले आवडते छंद प्रत्येकाने मनापासून जोपासले पाहिजे हे करत असताना शाळेची शिस्त व आई वडिलांचे संस्कार अंगीकृत करावे असे प्रतिपादन चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नितीन नंदन यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: