देशी – विदेशी तालवाद्यांच्या आविष्काराने रंगला तालचक्र सांगीतिक कार्यक्रम
पुणे : तबला आणि पखवाजाची सुंदर जुगलबंदी, त्यांनतर देशी – विदेशी वाद्यांच्या साथीने सादर झालेले सुरेल हार्मोनियमच्या वादन आणि सोबतीला वाद्यांच्या तालावर सादर झालेल्या विविध लोकप्रिय रचनांचा मेडली’च्या माध्यमातून कर्णमधुर अशा तालवाद्यांचा अविष्कार कला रसिकांनी अनुभवला.
प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे व पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० व्या ‘तालचक्र’ संगीत महोत्सवास शुक्रवारी, १८ नोव्हेंबर रोजी सुरवात झाली. टिळक रस्ता येथील ‘ न्यू इंग्लिश स्कूल’च्या गणेश सभागृह येथे झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात तबलावादक पांडुरंग पवार आणि पखवाज वादक सुखद मुंडे यांनी तबला – पखवाज जुगलबंदी सादर केली. तर हार्मोनियम वादक तन्मय देवचके यांनी आपल्या सहकलाकारांसोबत देशी- विदेशी वाद्यांच्या साथीने हार्मोनियमवादनाचा अनोखा असा ‘तन्मय इन हार्मनी’ हा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी पद्मश्री पं.विजय घाटे, पं. अतुलकुमार उपाध्ये, राजस उपाध्ये हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरवात तबलावादक पांडुरंग पवार आणि पखवाज वादक सुखद मुंडे यांच्या तबला – पखवाज जुगलबंदीने झाली. त्यांनी आपल्या वादनाची सुरवात ‘ उठाण ‘ सादरीकरणाद्वारे केली. त्यानंतर तीन तालात शिवस्तुती आणि धा ची परण, तबल्याच्या माध्यमातून ‘कायदे’ आणि पखवाजच्या माध्यमातून ‘प्रस्तार’ , सवाल – जवाब, रेला सादर झाले. चक्रधार तिहाई’च्या माध्यमातून त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना हार्मोनियमसाठी गंगाधर शिंदे यांनी साथसंगत केली.
