Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आव्हाडांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय शरद पवारच घेणार – अजित पवार

ठाणे  : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, यानंतर संध्याकाळी अजित पवारही जितेंद्र आव्हाड यांना भेटायला गेले. आव्हाडांच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यावर अजित पवार यांनी स्पष्ट मत मांडलं.

‘जितेंद्र आव्हाड पवार साहेबांना दैवत मानतात, पवार साहेब शेवटचा निर्णय सांगतील, तोच निर्णय आव्हाड मान्य करतील, त्यांना तो पटो किंवा न पटो. साहेबांचा शब्द म्हणून ते मान्य करतील. हे मी त्यांच्या साक्षीने सांगतो. जितेंद्र आव्हाड यांनी ते ट्वीट मागे घ्यावं,’ असं अजित पवार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर बोलले, त्यामुळे आव्हाडांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय शरद पवारच घेणार, हे स्पष्ट झालं आहे.

त्या क्लिपमध्ये कुठेही विनयभंग झालेलं दिसत नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असेल, तर ही लाजिरवाणी बाब आहे. खरंतर मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोरच सगळं घडलं आहे, विनयभंग झालेला नाही, हे सांगायला पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

‘याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? त्या भगिनीला विनयभंगाचा गुन्हा नोंदवायला कुणी सांगितलं. यामागे षडयंत्र आहे, असं माझं स्पष्ट मत आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घातलं पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन हे केलं जातंय. पोलीस दबावाखाली वागत आहेत. आमच्याकडे सुरूवातीपासून गृहखातं होतं, पण कधीही असा गैरवापर केला नाही. लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. आम्ही सगळे जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी आहोत. लोकशाही टिकली पाहिजे. जर चूक असेल तर कारवाई करा. राज्यातले प्रकल्प बाहेर जात आहेत, हे सरकारने सांगितले पाहिजे, नको त्या गोष्टींना महत्त्व दिलं जात आहे, हे दुर्दैवी आहे. काळ कुणाचाही असो, कायद्यानुसार काम केलं पाहिजे,’ असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading