कीर्तनरंगी रंगला संत नामदेव महाराज ७५२ वा जयंती सोहळा
पुणे : संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ह.भ.प. मुरारी महाराज नामदास (पंढरपूर) यांची ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन सेवा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. नेहा भोसले (साळेकर) महाराज यांचा ‘गजर कीर्तनाचा’ आणि ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर यांच्या नारदीय कीर्तनाने संत नामदेव महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित सोहळा कीर्तनरंगी रंगला.
श्री संत नामदेव महाराजांच्या ७५२ व्या जयंती निमित्त नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्यावतीने ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कीर्तन महोत्सवाचे आयोजन आरसीएम गुजराती हायस्कूल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन ना.स.प. पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके, सचिव सुभाष मुळे, प्रशांत सातपुते, उपाध्यक्ष प्रदीप खोले, रणजित माळवदे, कुंदन गोरटे, सोमनाथ मेटे, सुभाष पांढरकामे, शिवाजी माळवदकर, राहुल सुपेकर, शेखर बारटक्के, स्वप्निल खुर्द, यांनी केले. तर प्रभाकर गुजर व दिपक गुजर यांचे मोलाचे सहकार्य झाले.
हर्षदबुवा जोगळेकर म्हणाले, जीवन सुखकर करण्याची सोपी पद्धत सांगताना नामदेव महाराज म्हणतात प्रथमता नाम गावू दुसरे नाम ध्यावू व तिसरे नाम विठोबाला वाहू. नामाच्या माध्यमातून गुरू ज्ञान देतात. गुरुंमुळे ज्ञान कळते आणि ज्ञानातून देव कळतो. निराकार असणारे परब्रह्म सगुण साकार झाले ते कळायला नाम एकच धागा आहे. नामजप श्रेष्ठ यज्ञ असून नाम हेच परब्रह्म आहे.
संदीप लचके म्हणाले, मराठी अभिनेते स्वानंद बर्वे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले होते. गायक संजीव मेहेंदळे, कविता मेहेंदळे व सहकारी यांचा भक्ती संगीत कार्यक्रम देखील संपन्न झाला. महोत्सवात अभिनेते अवधूत जोशी, संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे, डाॅ. भावार्थ रामचंद्र देखणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डाॅ. महेश काकडे, संत नामदेव महाराज यांचे अभ्यासक डाॅ. ओम दत्तोपासक, अमित गायकवाड यांचेसह नामदेव समाजोन्नती परिषद व पुणे शहर शाखेचे पदाधिकारी यांचेसह पुणेकर बहुजनाची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
