मांजर पाळायची असेल तर महापालिकेकडून परवाना घ्यावा लागणार
पुणे : मांजर हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये मांजर पाळल्याचं पाहायला मिळतं. मात्र, मांजर पाळण्याची हौस असणाऱ्या पुणेकरांसाठी आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
पुण्यात आता यापुढे मांजर पाळायची असेल तर महापालिकेकडून परवाना घ्यावा लागणार आहे. याआधी श्वान अर्थात कुत्रा पाळायचा असेल तर महापालिकेचा परवाना घ्यावा लागत होता. मात्र मांजर पाळण्यासाठी असे कुठलेही नियम नव्हते.
त्यासाठी अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि 50 रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे. यासोबतच अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे. याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत. यासोबतच ही नोंदणी दरवर्षी नव्याने करावी लागेल.
नूतनीकरण करताना 50 रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क घेतले जाणार आहेत. याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महापालिकेने कुत्र्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. तसंच मांजराची नोंदणीही ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
