Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सामाजिक जाणिवेचे भान जपण्याचे अभिनेत्याकडे उत्तरदायित्व : डॉ. प्रवीण भोळे

पुणे : गायन, वादन आणि नृत्य या कला प्रशिक्षणाशी जोडल्या गेलेल्या आहेत. अभिनेत्याकडे जन्मजात अभिनयाचे कलागुण असतात त्यामुळे त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता नाही, असा समज आहे. कलेच्या प्रशिक्षणाला सुरुवात असते पण अंत नसतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी केले. अभिनेत्याकडे सामाजिक जाणिवेचे भान जपण्याचे उत्तरदायित्व असते, असेही त्यांनी नमूद केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र व नाट्यसंस्कार कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पहिल्या अभिनय अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा आणि नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात डॉ. भोळे बोलत होते. भारत स्काऊट ग्राउंड सभागृहात हा समारंभ झाला. अभिनय प्रमाणपत्र वितरण डॉ. भोळे यांच्या हस्ते तर नाट्यछटा लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरूड यांच्या हस्ते झाले. सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचे परिक्षक मिलिंद सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी व्यासपीठावर होते.
डॉ. भोळे म्हणाले, अभिनयाचे प्रशिक्षण हे उत्तर देणारे नसते तर प्रश्न निर्माण करणारे असते. यात विशिष्ट अशी उत्तरे नसतात यामुळेच प्रत्येक कलाकारात वेगळेपण असते, हे अभिनय कलेचे मर्म आहे. अभिनय प्रशिक्षणातून ज्ञानात तर भर पडतेच पण प्रशिक्षण आनंददायी असते. इतर कला हौसेखातर जोपासता येतात, परंतु नाटक ही एक अशी कला आहे यात समूहाद्वारे पुढे जावे लागते.
प्रशिक्षण वर्गाची माहिती मार्गदर्शक अश्विनी आरे यांनी सांगितली. पुढील अभिनय वर्ग 1 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याचे प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दिप्ती आसवडेकर यांनी केले.
सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेतील विजेते : गट एक (वय आठ ते 12 वर्षे) प्रथम – तक्षील अभ्यंकर, द्वितीय स्वानंदी बाब्रेकर. गट दोन (13 ते 18) प्रथम – अंशुल गांधी, द्वितीय आर्या कुलकर्णी. गट तीन (18 ते 60 खुला गट) प्रथम – उमेश घेवरीकर, द्वितीय अतुल दिवाकर, तृतीय शिल्पा कुलकर्णी. खुला गट (60 वर्षांवरील) प्रथम – मिलिंद नाईक.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading