साखर निर्यातीवरील बंदी आणखी एक वर्ष कायम
नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे. ही बंदी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कायम राहणार आहे, अशी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश आहे.
देशातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १ जून २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निर्यातीवरील ही बंदी ३१ ऑक्टोबर रोजी संपणार होती, जी आता एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध टॅरिफ रेट कोटा अंतर्गत यूएस आणि युरोपियन युनियनला होणा-या निर्यातीवर लागू होणार नाहीत.
भारत हा जगातील दुस-या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. भारतातून बांगला देश, इंडोनेशिया, मलेशिया आणि दुबईसह अनेक देशांमध्ये साखरेची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. गेल्या वर्षी भारताने विक्रमी पातळीवर साखर निर्यात केली होती. गेल्या वर्षी सरकारने निर्यातीसाठी ६० लाख मेट्रिक टन साखरेची मर्यादा निश्चित केली होती, तर ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली होती. यावर्षी ८२ एलएमटी साखर निर्यात झाली.
